तिकडे लाथा बसल्या म्हणून तुम्हाला आई आठवली, संजय राऊत मिंध्यांवर कडाडले

मिंध्यांसोबत गेलेल्यांचे परतीसाठी अनेक फोन आले. पण आता आमच्या दृष्टीने दरवाजे बंद झाले आहेत. तिकडे लाथा बसल्या म्हणून आता तुम्हाला तुमची आई आठवली, हे कसं चालेल? असा प्रश्न विचारत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी मिंध्यांवर निशाणा साधला आहे.

एबीपी माझा या वृत्तवाहिनीच्या एका विशेष कार्यक्रमात संजय राऊत बोलत होते. मिंध्यांच्या गटातील अनेकांचे फोन आल्याचं यावेळी राऊत यांनी सांगितलं. ते म्हणाले, शिंदे गटात गेलेल्यांचे आम्हाला पुन्हा पदरात घ्या, यासाठी फोन आले आहेत. आमची चूक झाली, आम्हाला पुन्हा घ्या, आम्हाला पुन्हा मशालीच्या प्रकाशात घ्या, असं म्हणत अनेकांनी गेल्या काही दिवसात फोन केले, असा गौप्यस्फोट संजय राऊतांनी केला आहे. पण, आता चर्चा नाही, दरवाजे बंद ही आमची भूमिका आहे. जे गेले ते गेले, ज्याला गद्दारीचा शिक्का लागतो तो कधीच मोठा होत नसतो. तुम्हाला तिकडे लाथा बसल्या म्हणून तुम्हाला तुमची आई आठवली, हे कसं काय चालेल? तुमच्या गैरहजेरीत ज्यांनी हा पक्ष टिकवला, वाढवला, स्वाभिमानाने लढले, ज्यांच्यावर गुन्हे दाखल झाले, जे तुरुंगात गेले, त्यांना आम्ही काय उत्तर द्यायचं? असं म्हणत संजय राऊतांनी गद्दारांना पुन्हा शिवसेनेत स्थान नसल्याचं स्पष्ट केलं आहे.

शिंदेच्या सोबत गेलेल्यांसाठी शिवसेना आणि मातोश्रीचे दरवाजे कायमचे बंद आहेत का या प्रश्नावर बोलताना राऊत म्हणाले, जे शिंदेसोबत गेले त्यांच्यासाठी आमच्या मनातील दरवाजे कधीच बंद झाले आहेत. आमच्या मनाच्या भावना मातोश्री जाणतं. गद्दारांना आता पुन्हा शिवसेनेत स्थान नाही, असं उद्धव ठाकरेंनीही सांगितलं आहे, असं राऊत यांनी स्पष्ट केलं.

राऊत पुढे म्हणाले की, भाजपने नाकारलेल्या खासदाराला प्रवेश दिला. पण त्यांना आम्ही उमेदवारी दिली नाही. ज्यांनी शिवसेनेच्या तिकीटावर निवडून येत गद्दारी केली बेईमानी केली मी त्यांच्याविषयी बोलतोय, त्यांना पुन्हा स्थान नाही. यामध्ये आता फायदा तोटा नाही, असंही राऊत म्हणाले आहेत.