लबाड लांडगं ढोंग करतंय, शेजारी बसून पत्र लिहायचं सोंग करतंय! फडणवीसांच्या पत्रावर राऊतांचा टोला

भाजपकडून ज्या नवाब मलिकांवर देशद्रोहाचे आरोप सातत्याने करण्यात आले, तेच मलिक विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात सत्ताधारी बाकांवर बसले. विरोधकांनी सवाल उपस्थित केल्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकाळी मलिकांची पाठराखण केली, मात्र सायंकाळी माघार घेत मलिक यांना सोबत घेऊ नका, असे पत्र अजित पवार यांना पाठवले. हे पत्र पाठवणे सोंग असल्याचे टोला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे. ते माध्यमांशी बोलत होते.

देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांना लिहिलेल्या पत्राबाबत माध्यम प्रतिनिधींनी विचारले असता खासदार संजय राऊत यांनी तुफान फटकेबाजी केली. नागपूरला लबाड लांडगे ढोंग करतंय आणि बाकी सगळे सोंग करताहेत. हे ढोंग आणि सोंग सुरू आहे. नवाब मलिक राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार असून त्यांच्यावरील आरोप अद्याप सिद्ध व्हायचे आहेत. आरोप सिद्ध होईपर्यंत त्यांना गुन्हेगार ठरवू नका अशी भूमिका अजित पवार, जयंत पाटील यांनी घेतली होती. त्यावेळी देवेंद्र फडणवीस, त्यांच्या सहकाऱ्यांनी आणि पाळलेल्या टोळ्यांनी विधानसभेत आणि विधानसभेबाहेर केलेली वक्तव्य ऐकण्यासारखी होती, असा उपरोधित टोला राऊत यांनी लगावला.

ते पुढे म्हणाले, नवाब मलिक हे वैद्यकीय जामिनावर सुटले आणि काल अजित पवार गटाच्या बाकावर जाऊन बसले. भाजप नैतिकतेचे हे ढोंग आहे. एखाद्या कपटी कोल्ह्याने वाघाचे कातडे पांघरून नैतिकतेच्या डरकाळ्या फोडाव्या तसा हा प्रकार आहे. सत्तेपेक्षा देश महत्वाचा अशी एकदम नवी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.महाराष्ट्राच्या 12 कोटी जनतेला हे माहीतच नव्हते.

नवाब मलिक यांच्यासारखीच केस आणि खटला प्रफुल्ल पटेल यांच्यावर आहे. त्यांचाही दाऊदच्या लोकांशी जमिनीचा व्यवहार असून ईडीने या संदर्भात कारवाई करत त्यांची संपत्तीही जप्त केली आहे. यूपीए सरकारमध्ये प्रफुल्ल पटेल मंत्री असताना याच मुद्द्यावर भाजपने सोनिया गांधींवर सवाल उपस्थित केले होते. आता त्यांच्याबद्दल काय मत आहे, असा सवाल राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांना विचारला.

नवाब मलिकांनी मत व्यक्त केल्यावर मी माझी भूमिका मांडेन! अजित पवारांचा सारवासारव करण्याचा प्रयत्न

ईडीने छापे टाकलेले आणि संपत्ती जप्त केलेले हसन मुश्रीफ, 70 हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्यावाले अजित पवार, ईडीने संपत्ती जप्त केली ते प्रताप सरनाईक, ईडी अटक करायला निघाली होती त्या भावना गवळी, संजय राठोड यांना सरकारमध्ये मानाचे स्थान आहे. या सर्वांना भाजपा तुरुंगात टाकणार होती. पण हल्ला फक्त मलिक यांच्यावर. बाकीचे यांच्या मांडीवर, कारण हे सर्व ढोंग आहे, अशी घणाघाती टीका राऊत यांनी केली.

आता एका उपमुख्यमंत्र्यांनी दुसऱ्या उपमुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. नागपूरमध्ये हे दोघेही एकाच सभागृहात बसतात आणि पत्र पाठवत आहेत. बाजूला बसून पत्र लिहावे लागतंय हे ढोंग आहे. त्यापेक्षा सभागृहात उभे रहा आणि नवाब मलिक किंवा अजित पवार यांना आम्ही हे सहन करणार नाही म्हणा. सत्ता येते आणि जाते, सत्तेपेक्षा देश मोठा आहे बोलणे ढोंग आहे. मलिकांप्रमाणेच प्रफुल्ल पटेल यांच्यावर आरोप आहेत. प्रफुल्ल पटेल काल अमित शहांना भेटले. मोदी गोंदियात आले तेव्हा प्रफुल्ल पटेलच स्वागताला होते. याच मोदींनी त्यांच्यावर हल्ला केला होता, अशी आठवणही राऊत यांनी करून दिली.