भाजपसोबत जाण्यास केव्हाच संमती नव्हती, भविष्यातही नसेल! – शरद पवार

 भाजपसोबत जाण्यास माझी केव्हाच संमती नव्हती आणि भविष्यातही नसेल, असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज स्पष्ट केले. पहाटेच्या शपथविधीला शरद पवार यांची संमती होती असा दावा अजित पवार यांनी केला होता. शरद पवार यांनी हा दावा पूर्णपणे फेटाळून लावला. त्याचवेळेस राज्यात पन्नास टक्क्यांहून अधिक जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी होतील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

2019 मध्ये देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्या पहाटेच्या शपथविधीच्या घटनेची पाच वर्षांनंतरही चर्चा सुरू आहे. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुन्हा एकदा भाष्य केले. राजभवनावर झालेल्या शपथविधीला शरद पवार यांची संमती होती. पहाटेच्या शपथविधीपूर्वी शरद पवार व आमची एका बडय़ा उद्योगपतीच्या घरी पेंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत बैठक झाली. या बैठकीनंतर आम्ही भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्यात खातेवाटपही निश्चित झाले होते, पण ऐनवेळी शरद पवार यांनी माघार घेतली. पण मी अमित शहांना दिलेला शब्द पाळला आणि मग पहाटेचा शपथविधी झाला, असा दावा अजित पवार यांनी केला.

अजित पवार यांनी केलेल्या या दाव्याला शरद पवार यांनी सणसणीत उत्तर दिले. भाजपसोबत जाण्यास आमच्या लोकांची केव्हाच संमती नव्हती आणि राहणारही नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या संदर्भात बोलताना शरद पवार म्हणाले की, देशात ‘इंडिया’ आघाडीचे सरकार आले तर ते सरकार स्थिर असेल. निवडणूक झाल्यावर ‘इंडिया’ आघाडीचे नेते एकत्र बसतील आणि पर्याय देतील. काही मुद्दय़ांवर मतभेद असतात, पण त्याकडे फारसे लक्ष देण्याची गरज नाही.  निवडणूक लढवायची आणि जिंकल्यावर एकत्र बसून पर्याय द्यायचा त्यात कुणालाही पुढे करता येईल. देशाला स्थिर सरकार देणे शक्य आहे, असेही शरद पवार म्हणाले.

शहांकडून ईडीचा गैरवापर

तपास यंत्रणेच्या गैरवापराविषयी बोलताना ते म्हणाले की, सध्या पेंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर होत आहे. देशात आजपर्यंत ईडीचा एवढा गैरवापर कधीच झाला नव्हता. देशातील दोन राज्यांचे मुख्यमंत्री सध्या तुरुंगात आहेत. ईडीचा वापर करून त्यांना तुरुंगात डांबण्यात आले आहे. अमित शहा व त्यांच्या पक्षाने ईडीचा गैरवापर चालवल्याचा आरोपही शरद पवार यांनी केली.

सीतेची मूर्ती का नाही; मोदींचीसुद्धा अडचण आहे

मला सभेमध्ये एका महिलेने अयोध्येमध्ये रामाची मूर्ती आह़े  त्या शेजारी सीतेची मूर्ती का नाही? असा प्रश्न उपस्थित केला. मी त्यांना सांगितले की मोदींना हे विचारले पाहिजे, पण त्यांचीसुद्धा अडचण आहे, अशी मार्मिक टिपणी शरद पवार यांनी केल्यावर एकच हशा पिकला.

मैदान बदलू, पण विचार महत्त्वाचे

बारामतीला शेवटची सभा शरद पवार ज्या मैदानावर घेत असतात ते मैदान यावेळी मात्र अजित पवार यांनी आरक्षित केले आहे. याचा समाचार शरद पवार यांनी घेतला. त्यांनी मैदान घेतले असले तर आपण दुसऱया दिवशी सभा घेऊ, वेळ पडली तर मैदान बदलू. मैदानाने काही फरक पडत नाही. विचार महत्त्वाचे आहेत, अशा शब्दांत त्यांनी अजित पवारांना फटकारले