सोडून गेले याची चिंता नाही, त्यांच्या राजकीय भविष्याची चिंता वाटते – शरद पवार

राष्ट्रवादीचे बडे नेते सोडून गेले याची चिंता नाही, त्यांच्या राजकीय भविष्याची चिंता वाटते. असा प्रकार इतरांना नवीन असेल, मला तो नवीन नाही. पक्ष संघटन बळकट करण्यासाठी मी उद्याच (दि. 3) सकाळी कराडला जाऊन यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचं दर्शन घेईन आणि उद्या दलित समाजाच्या मेळाव्याला उपस्थिती लावेन. त्यानंतर राज्यात आणि देशात जेवढं जाता येईल, जेवढं फिरता येईल, जेवढा लोकांशी संपर्क वाढवता येईल, हाच कार्यक्रम करण्याचा प्रयत्न करेन. पक्ष वाढीसाठी हीच माझी नीती असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले.

शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत बंडखोर आमदारांविरोधात दंड थोपटले. आमच्या पक्षातील काही सहकाऱयांनी पक्षापासून वेगळी भूमिका घेतली आहे. पक्षातील विधिमंडळातील सदस्यांनी कितपत वेगळी भूमिका घेतली आहे, याचे चित्र आणखी दोन-तीन दिवसांत समोर येईल. कारण ज्यांची नावं आली आहेत. त्यापैकी काही जणांनी माझ्याशी संपर्क साधला. काही लोकांनी मला सांगितलं की, आम्हाला निमंत्रित करण्यात आले, आम्ही सह्या केल्या आहेत. पण आमची भूमिका वेगळी आहे आणि ती कायम आहे. याबाबत मी आत्ताच बोलू इच्छित नाही. कारण, जनतेसमोर स्वच्छ चित्र मांडण्याची गरज आहे. माझ्याशी संपर्क साधलेल्या लोकांनी ते चित्र जनतेसमोर मांडावे अन्यथा त्यांनी वेगळी भूमिका घेतली आहे, असा निष्कर्ष मी काढेन, असा इशारा शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांना दिला आहे.

कुणी कुणावरही दावा सांगू शकतो

अजित पवार यांनी पक्षावर दावा सांगितला यावर शरद पवार म्हणाले, माझं काहीही म्हणणं नाही. कुणी कुणावरही दावा सांगूद्यात. माझा जनतेवर पूर्ण विश्वास आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना ही आम्हा लोकांच्या मतभेदातून, काही निर्णयातून झाली. पक्ष नसताना पक्ष आम्ही स्थापन केला. त्यामुळे कुणी काहीही सांगण्याचा प्रयत्न केला, आम्ही लोकांच्यात जाऊन भूमिका मांडू. त्या भूमिकेला लोकांचा पाठिंबा कसा मिळेल, याची काळजी घेऊ.

नऊ आमदारांवर कारवाई होणार

पक्षाच्या चौकटीच्या बाहेर गेले, त्यांच्यावर कारवाईसंदर्भात भूमिका घ्यावी लागेल. ज्यांनी पक्षाच्या विरोधात भूमिका घेतली आहे, त्या प्रत्येकाबाबत निर्णय घ्यावा लागेल. मंत्रीपदाची शपथ घेतलेल्या नऊ लोकांवर कारवाईबाबत निर्णय घेतला जाईल. ज्यांनी पक्षाच्या विरोधात भूमिका घेतली, त्या प्रत्येकाबाबत निर्णय घ्यावा लागेल, असेही पवार यांनी सांगितले.

प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरेंना इशारा

पक्षाच्या धोरणाशी विसंगत भूमिका कुणी घेतली असेल, तर ती योग्य नाही. त्यासाठी पक्षातले प्रमुख लोक बसतील आणि त्याबाबतचा निर्णय घेतील. या संदर्भात मला महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष आणि इतरांशी बोलावे लागेल. मी पक्षाचा राष्ट्रवादीचा अध्यक्ष आहे. मी काही पदाधिकाऱयांची नेमणूक केली होती. त्या पदाधिकाऱयावर मी जबाबदारी टाकली होती. सरचिटणीस म्हणून खासदार सुनील तटकरे तर, कार्याध्यक्ष म्हणून खासदार प्रफुल्ल पटेल यांची मी नेमणूक केली आहे. माझे त्यांना सांगणे आहे की पक्षाच्या हितासाठी जी पावले त्यांनी टाकायला हवी होती, ती त्यांनी टाकली नाहीत. त्यांनी आपली जबाबदारी पार पाडली नाही. त्यामुळे पक्षनेतृत्वाचा त्यांच्यावर विश्वास राहिला नाही. त्यामुळे त्यांनी स्वतःहून कार्यवाही करावी, नाहीतर मला कारवाई करावी लागेल, असा इशारा पवारांनी दिला.

ईडीमुळे आमदार अस्वस्थ

जे पक्षातून गेले ते विधानसभेचे सदस्य आहेत. ईडीच्या चौकशीमुळे काही आमदार अस्वस्थ होते. मोदींच्या वक्तव्यानंतर त्यांची अस्वस्थता आणखी वाढली. ज्यांना ईडीचे प्रॉब्लेम आहेत तेच गेले आहेत. यात छगन भुजबळ, अजित पवार, हसन मुश्रीफ यांची नावं आहेत. शपथविधी समारंभात अनेकांचे चेहरे चिंताजनक होते. पण पक्ष फुटला असे मी कधीच म्हणणार नाही. आम्ही न्यायालयात जाणार नाही, जनतेत जाणार आहोत असंही पवार यांनी यावेळी सांगितले.

राष्ट्रवादीचा आश्वासक चेहरा शरद पवारच

मी आयुष्यातली पहिली निवडणूक लढवली, ते चिन्ह होतं दोन बैल यांचं. त्यानंतर गाय-वासरू, चरखा या चिन्हावर निवडणूक लढवली. नंतर घडय़ाळ चिन्हावरही निवडणूक लढवली. त्यामुळे चिन्ह महत्त्वाचं नाही. समोरचा माणूस कोण आहे हे लोक बघतात, त्याचं काम काय आहे ते पाहतात. तेवढा जनतेवर माझा विश्वास आहे. आतापर्यंत मी 14 निवडणुका लढवल्या. त्या निवडणुकीत लोकांनी मला निवडून दिलं, त्याअर्थी जनतेचा माझ्यावर विश्वास आहे. यावेळी त्यांना पुढील काळात राष्ट्रवादीचा आश्वासक चेहरा कोण असेल, असा प्रश्न विचारण्यात आला, यावेळी त्यांनी हात वर करत राष्ट्रवादी काँग्रेसचा सगळ्यात आश्वासक चेहरा शरद पवारच अशी प्रतिक्रियाही दिली.

भुजबळ म्हणाले, तिथे जाऊन बघतो अन् तेच मंत्री झाले

सरकारमध्ये सामील होण्याबाबत अथवा आजच्या घडामोडींबाबत कोणीही चर्चा केली नाही. तिकडे गेलेल्या नऊ जणांपैकी छगन भुजबळ यांचा मला पह्न आला होता. जे काही चाललंय ते चांगलं नाही. तिथे जातो आणि काय चाललंय ते तुम्हाला सांगतो, असे सांगितले. पण त्यांनीच शपथ घेतल्याचं आम्हाला कळवलं, असे पवार यांनी सांगितले.

पंतप्रधान मोदींचे आभार

चार दिवसांपूर्वी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते, राष्ट्रवादी भ्रष्ट्राचारात बुडालेला पक्ष आहे. यावेळी त्यांनी इरिगेशन घोटाळ्याचा आणि शिखर बँकेचा उल्लेख केला. त्यानंतर आज मंत्रिमंडळात त्यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना शपथ दिली. याचा अर्थ त्यांनी केलेले आरोप वास्तव नव्हते. या आरोपांतून पक्षाला आणि ज्यांच्याबद्दल त्यांनी आरोप केले, त्यातून त्यांना मुक्त केले. मी मोदींचे आभार मानतो, असा टोलाही पवार यांनी मोदींना लगावला. तर, राष्ट्रवादी काँग्रेसचे जे सहकारी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामिल झाले आहेत. याचे सर्व श्रेय हे देशाचे पंतप्रधान यांना जातं, अशी खोचक टीकाही पवार यांनी केला.

उद्धव ठाकरे, ममता, खरगेंचा फोन

1986 साली निवडणुकीच्या नंतर मी काँग्रेस पक्षाचं नेतृत्व करत होतो. तेव्हा 58 पैकी 6 सोडले तर सगळे पक्ष सोडून गेले होते. मी त्या 58 चा विरोधी पक्षनेता होतो. पक्षाची मोट बांधण्यासाठी मी महाराष्ट्रभर फिरलो. पक्षाची बांधणी करण्याचं ठरवलं. जेव्हा निवडणुका झाल्या तेव्हा हीच संख्या 69 वर गेली. माझा महाराष्ट्राच्या जनतेवर पूर्णपणे विश्वास आहे. संयुक्त सरकार आम्ही स्थापन केलं. आज देशाच्या कानाकोपऱयातून अनेकांचे फोन येतायेत. आजच्या स्थितीत सगळे सांगतायेत आमची तुम्हाला साथ आहे. शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे)पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचा फोन आला. अनेक नेते आणि अनेक पक्षांनी मिळून पर्यायी नेतृत्व उभं करावं. सगळ्यांची हीच भूमिका आहे. त्यामुळे जो प्रकार घडलाय त्याची मला चिंता नाही, असे पवार म्हणाले.