निवडणुकीआधी दंगली घडवण्याचे सरकारचे कारस्थान, पहिली ठिणगी जालन्यात टाकली; संजय राऊत यांचा घणाघात

जालन्यातील आंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सनदशीर मार्गाने आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर बेछुट, अमानुष लाठीहल्ला करणाऱ्या राज्यसरकारचा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी समाचार घेतला. निवडणुकीआधी राज्यात आणि देशात दंगली घडवण्याचे सरकारचे कारस्थान असून त्याची पहिली ठिणगी जालन्यात टाकली, असा घणाघात राऊत यांनी केला. ते माध्यमांशी बोलत होते.

मुख्यमंत्र्यांनी जालन्यातील घटनेचे चौकशीचे आदेश दिले असून दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार आहेत. पण इथे तर सरकारच दोषी आहे. राज्य कोणाचे आहे? गृहखाते कोणाकडे आहे? विरोधी पक्षाकडे आहे का? पोलीस खाते काय विरोधी पक्ष चालवतो का? असा सवाल राऊत यांनी केला. ते पुढे म्हणाले की, आमच्या सरकारच्या काळातही असे मोर्चे निघाले, पण लाठीचार्ज किंवा असे हल्ले पोलिसांनी केले नाहीत. मुख्यमंत्री, अजित पवार स्वत: त्या समितीमध्ये होते, त्यांना प्रश्न माहिती आहे, असे असतानाही जालन्यातील आंदोलन का चिघळले? पोलिसांनी मराठा समाजाच्या आंदोलकांवर हल्ले का केले? याच्यामागे राजकीय सुसुत्रता आहे, असा आरोप राऊत यांनी केला.

मुंबईमध्ये ‘इंडिया’ची बैठक सुरू होती. महाराष्ट्रासह देशातील जनता या बैठकीकडे लक्ष ठेऊन होती. नेत्यांची भाषणे सर्व चॅनेलला दाखवली जात होती. त्यावरून लक्ष हटवण्यासाठी जालन्यात आंदोलकांवर लाठीहल्ला करून गोंधळ निर्माण करण्यात आला. याआधी महाराष्ट्रात मराठा समाजाने आपल्या मागण्यासाठी अनेक मोर्चे काढले. हे मोर्चे अत्यंत शिस्तबद्ध, शांततेने निघाले. त्यांच्याकडून कायदा व सुव्यवस्थेचे उल्लंघन झाल्याचे चित्र आतापर्यंत समोर आले नाही. अशावेळी जाणीवपूर्वक लाठीहल्ला करून महाराष्ट्रात तणाव निर्माण करायचा आणि त्या माध्यमातून मुंबईत चाललेल्या ‘इंडिया’च्या बैठकीवरून लोकांचे लक्ष हटवायचे, यासाठी सरकारने सुनियोजित पद्धतीने केलेला हा लाठीहल्ला आहे. शिंदे-फडणवीस-पवार सरकारचे वैफल्य, अस्वस्थता यातून बाहेर आली. अन्यथा मोर्चावर लाठीहल्ला करायचे काही कारण नव्हते, असेही संजय राऊत म्हणाले.

मोर्चामध्ये अबाल-वृद्ध, तरुण, लहान मुलं, महिला होत्या. अशावेळी या सरकारला संयम राखता आला असता. पण सरकारने मोर्चाचे वातावरण चिघळू दिले, त्यानंतर हा लाठीहल्ला घडवून आणला आणि महाराष्ट्रात तणाव निर्माण केला. निवडणुकीआधी या राज्यात आणि देशात विविध मार्गाने दंगली घडवल्या जातील असे आम्ही जेव्हा सांगतो त्याला हे प्रमाण आहे. आज बीड, जालनासह अनेक जिल्ह्यांमध्ये तणाव निर्माण झालेला आहे, जाळपोळ झालेली आहे हे या सरकारचे अपयश आहे. सरकारला हेच हवे आहे. निवडणुकीआधी जात, पात, धर्म या माध्यमातून महाराष्ट्रासह देशामध्ये दंगली घडवायच्या हे सरकारचे कारस्थान आहे. त्याची पहिली ठिणगी जालन्यात सरकारने टाकली आहे, अशी घणाघाती टीका राऊत यांनी केली.

मुख्यमंत्र्यांनी आणि त्यांच्या मंत्रिमंडळाने राजीनामा द्यावा इतके हे प्रकरण गंभीर आहे. काय करताय तुम्ही? हे सरकार फक्त कपट, कारस्थानामध्ये मग्शूल आहे. विरोधकांना तुरुंगात टाकायचे, खोटे खटले दाखल करायचे, भ्रष्टाचार करायचा. कुठे आहे कायदा व सुव्यवस्था? असा खडा सवाल राऊत यांनी उपस्थित केला.