कायद्याचे धिंडवडे काढणाऱ्या सरकारने तत्काळ सत्ता सोडावी – आदित्य ठाकरे

मिंधे व भाजपचे घटनाबाह्य सरकार सत्तेत आल्यापासून राज्यात वारंवार दंगली उसळत आहेत, सामान्य जनतेवर लाठीहल्ले होत आहेत. यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारला फटकारले आहे. तसेच अशा प्रकारे कायद्याचे धिंडवडे काढणाऱ्या सरकारने तत्काळ राजीनामे देत सत्ता सोडावी, असा हल्लाबोल आदित्य ठाकरे यांनी केला आहे.

शुक्रवारी जालन्यातील अंबड येथे शांततेत आंदोलन करणाऱ्या मराठा समाजातील आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. आंदोलक तरुणांसह महिला, लहान मुले, वृद्धांवर रक्तबंबाळ होईपर्यंत पोलिसांनी लाठय़ा चालवल्या. या लाठीहल्ल्याचा संपूर्ण राज्यभरातून निषेध केला जात आहे. आदित्य ठाकरे यांनी देखील ट्विट करत राज्य सरकारला फटकारले आहे.

”वारकऱ्यांवर लाठीहल्ला, कोकणी भूमीपुत्रांवर लाठीहल्ला, मराठा आरक्षण आंदोलकांवर लाठीहल्ला, महिलांचा वारंवार होणारा अपमान, अत्याचार, हिंसा, ह्यामुळे निर्माण झालेला महिला सुरक्षेचा गंभीर प्रश्न, वारंवार उसळलेल्या दंगली, कार्यकर्त्यांवर खोट्या केसेस, धरपकड, महाराष्ट्रात हे काय चाललंय? गृहमंत्री आणि घटनाबाह्य मुख्यमंत्री काय करताएत? राजकीय पोळी भाजण्यासाठी यंत्रणांचा वापर करत आहेत. महाराष्ट्रातील कायदा व सुव्यवस्थेचे जाणून बुजून धिंदवडे काढणाऱ्या कावेबाज खोके सरकारने तत्काळ राजीनामे द्यावेत आणि सत्ता सोडावी” असे ट्विट करत त्यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला.