गीताबोध – अर्जुनाचा चष्मा

>> गुरुनाथ तेंडुलकर

मागील लेखात आपण पाहिलं की, रणांगणामध्ये स्वजनांना पाहून अर्जुन भांबावला. अचानक त्याचं मानसिक संतुलन बिघडलं. त्याची क्षात्रवृत्ती लोप पावून त्याला युद्धाची व्यर्थता जाणवू लागली. हे सगळं अचानक झालेलं आहे. कालपर्यंत अर्जुन युद्धाला उत्सुक होता. व्यूहरचना करून कशा प्रकारे युद्ध करायचं? कोणी कोणाला मारायचं? याचे सगळे आराखडे मांडण्यात गर्क होता. मग आताच काय झालं? आपल्याही बाबतीत अनेकदा असं घडतं. आपला एखादा जवळचा नातेवाईक आजारी असतो. डॉक्टरांनी आशा सोडलेली असते. हा माणूस आता वाचणार नाही याबद्दल आपणही आपल्या मनाची तयारी केलेली असते, पण तरीही आपल्याला अतीव दुःख होतं. नापास होण्याची खात्री असलेल्या विद्यार्थ्यालादेखील प्रत्यक्षात परीक्षेचा ‘निकाल’ लागल्यानंतर नैराश्य येतं.

अर्जुनाच्या बाबतीतदेखील असाच काहीसा प्रकार घडला. अर्जुन मुळातच थोडा हळवा आणि ऋजू स्वभावाचा असल्यामुळे त्याच्या मनावर झालेला परिणाम हा अधिक खोल होता. तो केवळ भांबावलाच नाही, तर तो हताश झाला. नैराश्यामुळे मानसिक संतुलनच बिघडलं. मानसिक संतुलन बिघडलेल्या माणसाची अनेक लक्षणं असतात. त्यापैकी काही बाह्यात्कारी दिसतात, तर काही त्याच्या उक्तीतून-कृतीतून जाणवतात. त्यापैकी एक लक्षण म्हणजे असंबद्ध बडबड. अर्जुन असाच वेडय़ासारखा बडबडतोय आणि आपण जे बोलतोय तेच कसं योग्य आहे हे प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णाला पटवून देण्याचा दुबळा प्रयत्न करतोय.

वेडसर माणसाचं आणखी एक लक्षण म्हणजे स्वतच्या बोलण्यावागण्याचं विनाकारण समर्थन करणं. आपण जे वागतोय त्यामागची भूमिका इतरांना पटेपर्यंत समजावून सांगण्याचा प्रयत्न करणं. अर्जुन तेच तर करतोय. तो एकांगी विचार करतोय. प्रत्यक्ष युद्धभूमीवर त्याला अहिंसेचं तत्त्वज्ञान सुचलंय आणि हेच सर्वश्रेष्ठ तत्त्वज्ञान आहे असं त्याला वाटून तो त्याचा पुरस्कार करतोय. ते एकांगी तत्त्वज्ञान पटवून देण्याचा प्रयत्न करतोय. कुणाला, तर भगवान श्रीकृष्णाला. जो तत्त्वज्ञान्यांचा तत्त्वज्ञ आहे अशा भगवंताला अर्जुन ‘युद्ध कसं वाईट आहे’ हे सांगताना म्हणतोय.

निहत्य धार्तराष्ट्रान का प्रीति स्यात, जनार्दन
पापम् एव आश्रयेत् अस्मान् हत्वा एतान् आततायिन ।। 36 ।।
तस्मात् न अर्हाः वयम् हन्तुम् धार्तराष्ट्रान् स्व बान्धवान्
स्वजनं हि कथं हत्वा सुखिन स्याम माधव ।। 37 ।।
यद्यपि एते न पश्यन्ति लोभापहत चेतस
कुलक्षयम् कृतम् दोषम् मित्रद्रोहे च पातकम् ।। 38 ।।
कथम् न ज्ञेयम् अस्माभि पापात् अस्मात निवर्तितुम्
कुलक्षयम् कृतम् दोषम् प्रपश्यद्भि जनार्दन ।। 39 ।।
कुलक्षये प्रणश्यन्ति कुलधर्माः सनातनाः
धर्मे नष्टे कुलम् कृत्सम् अधर्मः अभिभवति उत ।। 40 ।।
अधर्माभिभवात् कृष्ण प्रदुष्यन्ति कुलस्त्रियाः
स्त्राrषु दुष्टासु वाष्णेय जायते वर्णसंकर ।। 41 ।।
संकर नरकाय एव कुलघ्नानां कुलस्य च
पतन्ति पितर हि एषाम लुप्तपिंण्डोदकािढयाः ।। 42 ।।
दोषैः एतैः कुलघ्नानाम् वर्णसंकर कारकै :
उत्साद्यन्ते जातिधर्माः कुलधर्माः च शाश्वताः ।। 43 ।।
उत्सन्न कुलधर्माणां मनुष्याणां जनार्दन
नरके अनियतम् वास भवतिक इतिक अनुशुश्रुम।। 44 ।।
अहो बत महत्पापम् कर्तुम् व्यवसिताः वयम्
यत् राज्य सुखलोभेन हन्तुम स्वजनम् उद्यताः ।। 45 ।।
यदिमाम् अप्रतीकारम् अशस्त्रम् शस्त्रपाणय
धार्तराष्ट्राः रणे हन्युः तत् मे क्षेमतरम् भवेत् ।। 46 ।।

भावार्थ : हे जनार्दना, धृतराष्ट्राच्या या मुलांना मारून आम्हाला काय आनंद होणार आहे? उलट या आततायींना मारल्याचं पापच आम्हाला लागेल. म्हणून यांना मारणं योग्य नाही. हे आमच्याच कुलातील आहेत. आमचे स्वजन आहेत. या स्वजनांना मारून आम्ही सुखी कसे काय होऊ शकतो? त्यांची बुद्धी लोभामुळे भ्रष्ट झाली आहे म्हणून त्यांना कुलाचा नाश आणि त्यातून निर्माण होणारे दोष दिसत नाहीत. स्वकीयांशी आणि मित्रांशी द्रोह करण्याचं पातक त्यांना उमगत नसलं तरी आम्हाला हे स्पष्ट जाणवत आहे. असं असताना या पापापासून परावृत्त होण्याचा आम्ही तरी प्रयत्न करायलाच हवा. या युद्धाच्या परिणामाने संपूर्ण कुलाचा नाश होईल. कुलाचा नाश झाला की, परंपरागत चालत आलेले कुलधर्म नष्ट होतात. कुलाचार नाहीसा झाला की, पापाचा फैलाव होतो. पाप वाढल्यामुळे कुलस्त्रिया बिघडतात. त्यांच्यावर कोणताच धरबंध राहत नाही आणि त्याचा परिणाम म्हणून वर्णसंकर उद्भवतो आणि वर्णव्यवस्थेचा नाश होतो. वर्णसंकर झाला की श्राद्ध, जलतर्पण इत्यादी क्रिया बंद पडतात आणि त्यामुळे पितर अधोगतीला जातात. ज्यांचे कुलधर्म नष्ट झाले आहेत अशा कुलातील लोकांना मृत्यूनंतर केवळ नरकातच जागा असते असं म्हटलं जातं.

हे श्रीकृष्णा, आम्ही बुद्धिमान असूनही राज्य आणि सुखाच्या लोभाने आमच्याच कुटुंबीयांना मारण्यास उद्युक्त झालो ही केवढी खेदाची गोष्ट आहे. आम्ही निशस्त्र झाल्यानंतर या कौरवांनी आम्हाला जरी ठार मारलं तर ते अधिक कल्याणकारक ठरेल. इथे मला खेदानं नमूद करावंसं वाटतंय की, आपल्या देशातील जनतेनं राष्ट्रपिता म्हणून ज्यांना गौरवलं त्या मोहनदास करमचंद गांधी यांनीदेखील अशाच प्रकारच्या एकांगी अहिंसेच्या तत्त्वज्ञानाचा पुरस्कार केला होता. मुसलमान हे आपले बांधव आहेत. त्यांनी आपल्यावर शस्त्र उगारलं तरी आपण त्यांचा प्रतिकार शस्त्राने न करता अहिंसेनेच त्यांना उत्तर द्यायला हवं… वगैरे वगैरे. चांगुलपणाचा अतिरेकदेखील विनाशालाच कारणीभूत ठरतो.

अर्जुनाच्या सुदैवाने त्याला भगवान श्रीकृष्णासारखा सखा-सारथी, गुरू भेटला. अर्जुनाला या नैराश्याच्या गर्तेतून बाहेर काढून योग्य मार्गावर आणण्याचं काम सोपं नव्हतं. अर्जुनच कशाला, कोणत्याही एका विशिष्ट रंगाचा चष्मा घालून दिसणारं जग हे त्याच रंगाचं आहे, असं म्हणणाऱया माणसाच्या डोळ्यांवरचा रंगीत चष्मा काढून त्याला जगाकडे स्वच्छ दृष्टीने पाहायला शिकवणं ही गोष्ट अत्यंत अवघड असते. श्रीकृष्णाने हे कार्य यशस्वीरीत्या केलं. संपूर्ण मोहवश झालेल्या अर्जुनाला ‘नष्टो मोह स्मृति लब्धा’ म्हणजेच ‘माझा मोह नाहीसा झाला आहे. मला माझी गेलेली स्मृती पुन्हा प्राप्त झाली आहे’ इथपर्यंत आणण्याचं काम भगवद्गीतेच्या माध्यमातून भगवंताने केलं आणि अर्जुनाच्या निमित्ताने संपूर्ण मानवजातीला सुख-यश-संपन्नतेचा मार्ग दाखवला. म्हणूनच म्हणतात… ‘कृष्णं वंदे जगद्गुरूम…’

[email protected]