स्वप्नाली नराळे हिला पराभवाचा धक्का

जश मोदी, नील मुळ्ये, श्रृती अमृते यांनी द्वितीय राज्य मानांकन टेबल टेनिस स्पर्धेत विजयी घोडदौड कायम राखली. मात्र महिला गटात द्वितीय मानांकित खेळाडू स्वप्नाली नराळे हिला दुसर्या फेरीत पराभवाचा धक्का बसला.

नागपूर येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत पुरुषांच्या गटात मुंबई टीएसटी संघाचा अग्रमानांकित खेळाडू मोदी याने आपला सहकारी नितेश कुमावत याला 11-1,11-4,11-4 असे निष्प्रभ केले. पुण्याचा खेळाडू नील याने मुंबई महानगर जिल्हा संघाच्या निकझात केरवाला याचा 11-7, 11-5, 11-6 असा सहज पराभव केला. तृतीय मानांकित खेळाडू चिन्मय सोमय्या (मुंबई टीएसटी) याने तिसर्या फेरीकडे वाटचाल करताना ठाण्याच्या रोनीत अनेगुंडी याचे आव्हान 11-5,8-11, 11-9,14-12 असे संघर्षपूर्ण लढतीनंतर संपुष्टात आणले. द्वितीय मानांकित खेळाडू दीपित पाटील याने पुण्याच्या प्रणव घोलकर याला 11-5,11-4, 11-6 असे पराभूत करीत तिसरी फेरी गाठली.

महिलांच्या गटात अग्रमानांकित खेळाडू श्रुती अमृते हिला नाशिकच्या मिताली पूरकर हिच्याविरुद्ध 11-3, 11-3, 11-5 असा विजय मिळवताना फारसे कष्ट घ्यावे लागले नाहीत. मात्र स्वप्नाली हिला ठाण्याच्या आद्यश्री जोग हिने 11-8, 9-11, 12-10, 11-5 असे पराभूत करीत आश्चर्यजनक विजय नोंदविला