वेब सीरिज – राजकारण आणि वंशवाद

>>तरंग वैद्य

मुंबई, मायानगरीचे दुसरे  नाव म्हणजे ‘सिटी ऑफ ड्रीम्स.’ महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरील महत्त्वाचं शहर. महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदू ठरलेल्या या शहरातील राजकीय घडामोडींवर आधारित महाराष्ट्राचं राजकारण मांडणारी ही मालिका. राजकारणातील वंशवाद हा मूळ गाभा ठेवत त्या अनुषंगाने समाज सेवा, नैतिक मूल्यं, एकनिष्ठता हे सर्व इतिहासजमा होऊन हल्लीचे राजकारण कुठल्या थरावर पोहोचले आहे हे सांगणारी ‘सिटी ऑफ ड्रीम्स’ वेब सीरिज सध्याच्या राजकीय परिस्थितीचे विश्लेषण करते.

जिथे स्वप्न साकारली जातात त्या शहराला ‘सिटी ऑफ ड्रीम्स’ म्हणतात. मुंबई, मायानगरीचे आणखी एक नाव. याच नावाने मे 2019 मध्ये या वेब सीरिजचा पहिला भाग प्रसारित झाला. अं हं…ही मालिका फिल्मी दुनियेवर आधारित नसून राजकारणावर आधारित आहे. आतापर्यंत बिहार, उत्तर प्रदेशच्या राजकारणावर अनेक चित्रपट, वेब सीरिज आल्या, पण महाराष्ट्राच्या राजकारणावरची बहुधा ही पहिलीच मालिका. यूपी, बिहारच्या राजकारणात मारामाऱया, हत्या, बाहुबलीचा सहभाग, कपट-कारस्थानांचा खेळ असल्यामुळे वेब सीरिजला लागणारे ‘ट्विस्ट, टर्न’  नावाचे खाद्य प्रचूर मात्रेत मिळते. तुलनेत महाराष्ट्राचे राजकारण सौम्य पातळीचे. असो…

‘हॉटस्टार’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर अतुल कुलकर्णी, सचिन पिळगावकर, प्रिया बापट, संदीप कुलकर्णी, सुशांत सिंगसारखे अभिनय संपन्न कलाकार घेऊन नागेश कुकुनूर या गुणी दिग्दर्शकाने मे 2019 मध्ये ‘सिटी ऑफ ड्रीम्स’ प्रसारित केली आणि वाहवा मिळवली. जुलै 2021 ला सीझन 2 आणि आता काही दिवसांपूर्वी मे 2023 ला सीझन 3 आला. सीझन 3 ची गाडी ही अशा एका वळणावर येऊन थांबली आहे की, सीझन 4 लवकरच येणार हे लक्षात येते.

कथा अर्थातच एका राजकीय नेत्याची अमेयराव गायकवाडची आहे. जो खूप महत्त्वाकांक्षी आहे. आपण स्थापन केलेल्या पक्षाची दोर कायम आपल्या आणि पश्चात परिवाराच्या हातातच राहावी असे परिवारवादाचे गणित त्याच्या डोक्यात असते, म्हणून तो आपल्या मुलाला आपला राजकीय वारस बनवण्यासाठी प्रयत्नशील असतो. खरं तर मुलगा वाया गेलेला आणि मुलगी हुशार असते पण इथे मुलगाच वारस ही बुरसटलेली विचारधारा आडवी येते आणि मग परिवारात आतल्या आत राजकारण सुरू होते, कुरघोडी होतात. ज्यांना निष्ठावान, जवळचे समजले जात होते तेच आगीत तेल ओततात आणि गोष्टी खूप खालच्या थराला कशा पोहोचतात हे सर्व म्हणजे ‘सिटी ऑफ ड्रीम्स.’ पोलीस आणि वेळ पडली तर गुंडांचा वापर आपल्या फायद्यासाठी राजकारणी कसा करतात याचे सखोल चित्रण या मालिकेत दर्शवले आहे.

खरं तर नागेश आणि त्याचा सहकारी रोहित यांनी ही कथा चित्रपटासाठी तयार केली होती, पण त्या काळात जो तो वेब सीरिजच्या मागे जात असल्यामुळे ही कथा पण तिकडे वळवली गेली. त्यामुळे अधूनमधून एकसुरी किंवा संथ वाटू शकते, पण कलाकार, दिग्दर्शक आणि टीमने मिळून कथेची रंजकता आणि प्रेक्षकांची उत्सुकता कायम राहावी याचा यशस्वी प्रयत्न केला आहे.

समाज सेवा, नैतिक मूल्य, एकनिष्ठता हे सर्व इतिहासजमा होऊन हल्लीचे राजकारण कुठल्या थरावर पोहोचले आहे हे ‘सिटी ऑफ ड्रीम्स’मध्ये खूप छान पद्धतीने दाखवले आहे. आपल्या फायद्यासाठी धर्माचे राजकारण, दंगे घडवून आणणे, गुन्हेगारांची मदत घेणे आणि प्रसंगी त्यांना मदत करणे हे सर्व बघताना चीड येते, प्रक्षोभ होतो. पण हीच आज राजकारणातील मुख्य अस्त्र आहेत हे माहीत असल्यामुळे मनावर ताबा ठेवावा लागतो. त्यात पैसा हे सर्वात प्रभावशाली अस्त्र, त्यामुळे त्याची देवाणघेवाण, काळा पैसा कुठे आणि कसा ठेवायचा ही दाखवणारी दृश्य ताकदीने चित्रित केली आहेत. गेल्या दहा वर्षांत चर्चेत असलेले आणि अनेक वेळा घडलेले ‘रिसॉर्ट राजकारण’ इथेही दाखवले आहे. हा घोडेबाजार बघितल्यावर आपण निवडून दिलेल्या प्रतिनिधीसाठीही ‘सबसे बडा रुपय्या’ हेच आहे हे बघून मन विषण्ण होते.

असं म्हणतात की, ज्याच्या मनात चोर असतो तो मालकाच्या डोळय़ांत डोळे घालून बोलू शकत नाही. सचिन पिळगावकर यांनी डोळय़ांचा वापर करून आपल्या वाटय़ाला आलेली दृश्ये छान वठवली आहेत. त्यांनी आतापर्यंत नेहमी स्वच्छ, सकारात्मक भूमिका केल्या.  ‘कटय़ार…’नंतर परत एकदा नकारात्मक भूमिकेत त्यांनी उठावदार अभिनय केला आहे. त्यांची ही छटा यापुढेही बघायला आवडेल. सर्वच प्रमुख कलाकार अभिनयसंपन्न असून सर्वांनी छान बॅटिंग केली आहे. एका कलाकाराचे नाव वरती मुद्दाम नमूद केले नाही. या मालिकेचा ‘तेंडुलकर’ जो आहे तो इन्स्पेक्टर वासिम खानच्या भूमिकेतला एजाझ खान. अगदी तेंडुलकरच्या सहज बॅटिंगसारखा त्याचा अभिनय सहज आहे. अमेयराव, त्यांची कन्या, गुरव काका सर्वच मराठी पात्रे असल्यामुळे प्रत्येक एपिसोडमध्ये दोन सलग मराठी वाक्ये देऊन पात्रे मराठी आहेत हे संवादातून दाखवून द्यायचा प्रयत्न केला आहे. त्या उलट मराठीतील विशिष्ट शब्द अधूनमधून संवादात पेरले असते, तर मराठीपण अधिक बोलके झाले असते.

आपल्या देशात राजकारणातील वंशवाद देश स्वतंत्र झाल्यापासून आजपर्यंत सुरू आहे. पूर्वी राष्ट्रीय पातळीवर एक परिवार होता. नंतर जम्मू-कश्मीर, उत्तर प्रदेश, बिहारसारख्या राज्यात हा ठळकपणे दिसला. आता तर अनेक असे राजनेते आहेत जे या वंशवादाच्या वेलीला खतपाणी देत आहेत. जे या वेब सीरिजमध्ये खूप तपशीलवार पद्धतीने दाखवले आहे आणि ते दाखवताना प्रेक्षकांचे कुतूहल कमी होणार नाही याची खबरदारी घेतली आहे. म्हणूनच 3 भाग आल्यावर ही ‘सिटी ऑफ ड्रीम्स’ नॉट आऊट आहे आणि तिची पुढची बॅटिंग बघण्यासाठी मी उत्सुक आहे.

(लेखक सिनेदिग्दर्शक व पटकथाकार आहेत)