टाटा पॉवर 2800 मेगावॅटचे जलविद्युत प्रकल्प उभारणार, 13 हजार कोटी रुपयांचा खर्च; राज्य सरकारसोबत करार

विजेच्या वाढत्या मागणीच्या पार्श्वभूमीवर टाटा पॉवर महाराष्ट्रात तब्बल 2800 मेगावॅट क्षमतेचे दोन उदंचन जलविद्युत प्रकल्प उभारणार आहे. पुणे आणि रायगड जिह्यात हे दोन्ही वीज प्रकल्प असणार आहेत. त्यासाठी टाटा पॉवरने राज्य सरकारसोबत सामंजस्य करार केला आहे. पुढील पाच वर्षांत हे जलविद्युत प्रकल्प कार्यान्वित करण्याचे उद्दिष्ट असून त्या माध्यमातून कोयना वीज प्रकल्पाच्या तुलनेत दीडपट वीज उपलब्ध होणार आहे. त्यामुळे भविष्यात महाराष्ट्रात वीज तुटवडय़ाचे टेन्शन असणार नाही.

महाराष्ट्राला डोंगरदऱयांचे वरदान लाभले असून त्यामध्ये तब्बल 30 हजार मेगावॅटहून अधिक क्षमतेचे उदंचन जलविद्युत प्रकल्प उभारणे शक्य असल्याचा अहवाल केंद्रीय विद्युत प्राधिकरणाने दिला होता. त्याची दखल घेत टाटा पॉवरने पुणे जिह्यातील शिरवटा येथे 1800 मेगावॅटचा तर रायगड जिह्यातील भिवपुरी येथे 1000 मेगावॅट क्षमतेचा उदंचन जलविद्युत प्रकल्प (पंपस्टोरेज) उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी राज्य सरकारसोबत नुकताच करार करण्यात आला आहे. या दोन्ही जलविद्युत प्रकल्पाच्या माध्यमातून जवळपास सहा हजारहून अधिक कुशल-अकुशल कमागारांच्या हाताला काम मिळणार आहे. सध्या टाटा पॉवरचे खोपोली, भिवपुरी आणि भिरा येथे जलविद्युत प्रकल्प असून त्यामाध्यमातून सुमारे 450 मेगावॅट वीजनिर्मिती केली जाते.

काय आहे उदंचन प्रकल्प

उदंचन जलविद्युत प्रकल्पाच्या माध्यमातून एकाच पाण्यावर सातत्याने वीजनिर्मिती करता येते. या प्रकल्पात पाण्याचे दोन तलाव असतात. त्यापैकी एक उंचीवर तर दुसरा खालच्या बाजूला असतो. उंचावरील तलावाच्या पाण्यावर दिवसभर वीजनिर्मिती केली जाते. त्यामुळे खालच्या बाजूला असलेल्या तलावात आलेले पाणी रात्रीच्या वेळी स्वस्तात वीज उपलब्ध असते तेव्हा पंपाच्या सहाय्याने उंचावरील तलावात सोडले जाते. दुसऱया दिवशी त्याच पाण्यावर पुन्हा वीजनिर्मिती केली जाते.