स्त्रियांच्या कल्याणासाठी…

>> अनघा सावंत

स्त्रियांनी स्त्रियांसाठी चालवलेली ‘स्त्रीकल्याण संघटना’ शाखा आज 71 व्या वर्षीदेखील जोमाने उभी आहे.

महिलांनी नवनवीन व्यवसाय सुरू करत स्वावलंबी व्हावे आणि स्वतःच्या पायावर उभे रहावे या उद्देशाने 1953 साली ‘स्त्री कल्याण संघटना’ या संस्थेची निर्मिती झाली. संघटनेने अधिकाधिक उद्योजिका तयार व्हाव्यात म्हणून काळानुसार व्यवसाय प्रशिक्षण, मार्गदर्शनपर शिबिरे तसेच महिलांनी तयार केलेल्या मालाला बाजारपेठ मिळावी म्हणून प्रदर्शने भरवत त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासावरदेखील भर दिला.

‘स्त्राr कल्याण संघटना’ ही शाखा ‘श्री समर्थ सेवक मंडळा’च्या विशाल वटवृक्षाच्या अनेक विस्तृत शाखांपैकी एक आहे. 1916 साली म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळात समाजात एकोपा निर्माण करून समाजजागृती करण्याच्या हेतूने ठाण्यातील काही तरुण मंडळींनी एकत्रित येऊन ‘श्री समर्थ सेवक मंडळा’ची स्थापना केली. प्रभात फेरी, भजन, मेळे अशा अनेक उपक्रमांच्या माध्यमातून लोकांच्या मनामनात स्वातंत्र्याबद्दल ज्योत पेटवली. मंडळाला 108 वर्षे पूर्ण झाली तरीही ही ज्योत तेवत ठेवण्याचे काम आजही मंडळाचे सभासद करत आहेत. याच मातृसंस्थेच्या छत्रछायेखाली समाजसेवेचा वसा घेत स्त्रियांनी स्त्रियांसाठी चालवलेली ‘स्त्राr कल्याण संघटना’ ही शाखा आज 71 व्या वर्षीदेखील जोमाने उभी आहे.

महिलांना आपले मनोगत, आपले विचार, आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देत संघटना वर्षभरात केवळ महिलांसाठी वक्तृत्व, निबंध, कथाकथन, पाककला, प्रश्नमंजुषा, क्रीडा आदी स्पर्धांचे आयोजन करते. संसाराच्या रहाटगाडय़ात गुंतलेल्या गृहिणीला स्वतःकडे लक्ष द्यायला वेळ मिळत नाही. त्यामुळे या महिलांच्या कलागुणांना योग्य तो न्याय देणारे उपक्रम संघटना राबवते. याशिवाय आपली संस्कृती जपण्यासाठी सणासुदीचे माहात्म्य सांगणारे कार्यक्रमही संघटनेतर्फे प्रतिवर्षी आयोजित केले जातात. मुलांना वाचनाची आवड लागावी तसेच वाचनसंस्कृतीत वाढ व्हावी यासाठी संघटना बाल वाचनालयही चालवते.

गेली अनेक वर्षे संघटनेशी जोडलेल्या सदस्या अमृता आर्ते यांनी सांगितले की, ‘‘माझे आई आणि बाबा निरपेक्षपणे, उत्साहाने ‘श्री समर्थ सेवक मंडळ’ आणि ‘स्त्राr कल्याण संघटने’चे कार्य करतात त्या वेळी त्यांना त्यांच्या वयाचादेखील विसर पडतो. त्यांच्यासारखे निःस्वार्थीपणे समाजसेवा करणारे अनेक सभासद मी लहानपणापासूनच पाहत आले. म्हणूनच नकळत मीसुद्धा या संघटनेचा एक भाग होऊन गेले आणि याचा मला नक्कीच अभिमान आहे.’’

शैला भाटवडेकर-चिटणीस, अनिता हजारे, नंदिनी लागू, स्वाती बापट, पूजा राणे, रश्मी कापडणे, अमृता आर्ते आणि शुभांगी साठे या ‘स्त्राr कल्याण संघटना’ सदस्य संघटनेची धुरा आजही व्यवस्थित सांभाळत आहेत.