मंथन -सुरक्षिततेच्या सफरचंदाला कीड!

>> महेश कोळी

हेरगिरीचा जिन आता पुन्हा एकदा बाटलीतून बाहेर आल्याचे दिसत आहे. जगातील सर्वात सुरक्षित मोबाईल फोन आणि कॉम्प्युटर बनवण्याचा दावा करणाऱया अॅपल या कंपनीने आपले उत्पादन वापरणाऱयांना नुकताच एक संदेश पाठवला आहे की, मर्सनेरी स्पायवेअरद्वारे हेरगिरी सॉफ्टवेअरद्वारे त्यांचे फोन हॅक केले जाऊ शकतात. त्यामुळे वापरकर्त्यांनी सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. हा संदेश 91 देशांतील लोकांना मेलद्वारे पाठवला आहे. अँड्रॉईड प्रणालीपेक्षा अॅपलची आयओएस अधिक सुरक्षित मानली जाते. तरीही अॅपलचे फोन हॅक होत असतील, तर मग अँड्रॉईडवर चालणाऱया इतर फोनच्या सुरक्षेची काय स्थिती असेल याची कल्पनाच न केलेली बरी!

एकविसाव्या शतकामध्ये मोबाईल फोन ही अन्न, वस्र, निवारा यांबरोबरीची गरज बनल्यासारखी स्थिती निर्माण झालेली असताना या स्मार्ट फोनच्या उपयुक्ततेपेक्षाही त्याच्या वापराचे धोके अधिक प्रमाणात समोर येत आहेत. आरोग्य क्षेत्रातील तज्ञ यामुळे डोळय़ांवर, मेंदूवर, आकलनशक्तीवर कसा प्रतिकूल परिणाम होतो हे सांगत आहेत, तर बालमानसशास्रज्ञ आणि संगोपनाच्या क्षेत्रातील तज्ञ यामुळे मुलांच्या भावविश्वावर कसा नकारात्मक परिणाम होत आहे व समाजव्यवस्थेत गैरप्रकार कसे वाढत आहेत याचे दाखले देत आहेत. बरे इतके सांगूनही अपरिहार्यता असल्याप्रमाणे मोबाईलचा वापर केला जात असताना त्याच्या माध्यमातून खासगी गोपनीय माहिती चोरली जात असल्याचे, त्यातील स्पायवेअर-मालवेअरद्वारे पाळत ठेवली जात असल्याचे समोर आले आहे.

मध्यंतरीच्या काळात मोबाईलच्या माध्यमातून होणाऱया हेरगिरीची बरीच चर्चा रंगली होती. आता हेरगिरीचा जिन पुन्हा एकदा बाटलीतून बाहेर आल्याचे दिसत आहे. जगातील सर्वात सुरक्षित मोबाईल फोन आणि कॉम्प्युटर बनवण्याचा दावा करणाऱया अॅपल या कंपनीने आपले उत्पादन वापरणाऱयांना संदेश पाठवला आहे की, मर्सनेरी स्पायवेअरद्वारे हेरगिरी सॉफ्टवेअरद्वारे त्यांचे फोन हॅक केले जाऊ शकतात. त्यामुळे वापरकर्त्यांनी सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. हा संदेश अॅपलने हिंदुस्थानसह 91 देशांतील त्यांच्या ग्राहकांना ई-मेलद्वारे पाठवला आहे. हे सॉफ्टवेअर वादग्रस्त ठरलेल्या ‘पेगॅसस’ स्पायवेअरप्रमाणे आहे. सहा महिन्यांपूर्वीही अॅपलने हिंदुस्थानातील काही लोकांना त्यांचे फोन पेगाससचे लक्ष्य असू शकतात, असा इशारा दिला होता. यातील बहुतांश विरोधी पक्षांचे नेते होते. हिंदुस्थानातील काही वापरकर्त्यांना 11 एप्रिलला पहाटे 12.30 च्या सुमारास धोका सूचना (थ्रेट नोटिफिकेशन) पाठवली गेली. यामध्ये म्हटले होते की, आपला फोन ‘भाडोत्री स्पायवेअर’द्वारे लक्ष्य केला जात आहे. मात्र या हेरगिरी सॉफ्टवेअरद्वारे ज्यांचे फोन हॅक करण्यात आले त्यांची नावे त्यांनी उघड केलेली नाहीत.

अॅपल ही तंत्रज्ञानाच्या विश्वातील जगातील सर्वात आघाडीची कंपनी आहे. 2007 मध्ये पहिला आयफोन बाजारात आला. त्यानंतर आज दीड दशकांनंतरची स्थिती पाहिल्यास जगभरात 1.46 अब्ज लोकांकडे अॅपलचा फोन आहे. जगात वापरल्या जाणाऱया स्मार्ट फोन्समध्ये अॅपलचा वाटा 21.67 टक्यांहून अधिक आहे.

अँड्रॉईड प्रणालीपेक्षा अॅपलची आयओएस ही प्रणाली अधिक प्रगत, अद्ययावत आणि तुलनेने अधिक सुरक्षित मानली जाते. असे असूनही अॅपलचे अत्यंत सुरक्षित मानले जाणारे फोन हॅक होत असतील, तर मग अँड्रॉईडवर चालणाऱया इतर फोनच्या सुरक्षेची काय स्थिती असेल याची कल्पनाच न केलेली बरी!

अॅपलचा संपूर्ण व्यवसाय आपल्या फोन आणि कॉम्प्युटरमध्ये कोणीही घुसखोरी करू शकत नाही या विश्वासावर आधारित असल्याने त्याच्यासाठीही हे मोठे आव्हान बनले आहे. अॅपलने कबूल केले आहे की, ही घुसखोरी कोणत्याही सामान्य सायबर चोराच्या आवाक्यातली नाही. कारण ज्या सॉफ्टवेअरद्वारे हा हल्ला केला जात आहे त्याची किंमत लाखो डॉलर्स आहे.
सुमारे तीन वर्षांपूर्वी जेव्हा हिंदुस्थानात पेगाससचा वापर उघडकीस आला, तेव्हा बराच गदारोळ झाला होता. सर्वोच्च न्यायालयात अनेक याचिका दाखल करण्यात आल्या. हे सॉफ्टवेअर इस्रायली सरकारने विकले असल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे याबाबत मखलाशी करताना इस्रायल सरकार म्हणते की, ते कोणत्याही स्वतंत्र व्यक्ती किंवा कंपनीला आम्ही ते विकत नाही, तर केवळ सरकारांनाच हे सॉफ्टवेअर दिले जाते. त्यामुळे हे प्रकरण अधिकच गंभीर बनले होते.

वास्तविक, पेगासेस हे सॉफ्टवेअर खरे तर एक प्रकारचे गुप्तहेर आहे. हे सॉफ्टवेअर कोणाच्याही फोनमध्ये गुपचूप इन्स्टॉल केले जाऊ शकते आणि त्यानंतर त्या फोनचा कॅमेरा, माईक इत्यादींवर नियंत्रण मिळवून तो संबंधित चोराला आपल्या पद्धतीने ऑपरेट करता येतो. सायबर सुरक्षा कंपनी कॅस्परस्कीच्या अहवालानुसार, पेगाससच्या मदतीने एक्रिप्टेड ऑडिओ आणि एनक्रिप्टेड संदेशदेखील वाचले जाऊ शकतात. आयमेसेज या बगचा फायदा घेऊन ते इन्स्टॉल केले जातात. आता तर कंपनीने अधिकृतरीत्या संदेश पाठवून इशारा दिल्यामुळे आयफोन वापरकर्त्यांच्या चिंता कमालीच्या वाढल्या आहेत.
(}sखक संगणक अभियंता आहेत)