दुर्मिळ मराठी नाटकांचे होणार जतन

मराठी रंगभूमीला कित्येक शतकांचा इतिहास आहे. नाटक हा मराठी माणसाच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. मराठी रंगभूमीच्या कित्येक शतकांच्या प्रवासात अनेक मैलाचे दगड ठरलेले नाटय़ाविष्कार सादर झाले आणि ही परंपरा आजही अबाधित आहे. महाराष्ट्राची नाट्य संस्कृती आणि दुर्मिळ नाटकांचा अनमोल ठेवा आता जतन केला जाणार आहे.

राज्य शासनाच्या पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या  माध्यमातून  जुन्या दर्जेदार आणि दुर्मिळ मराठी नाटकांचे जतन करण्यासाठी दिग्दर्शक आणि निर्मिती संस्थांना अनुदान देण्यात येणार आहे.  महाराष्ट्रात किर्लोस्कर, कृ. प्र. खाडिलकर, महात्मा फुले, अण्णाभाऊ साठे, राम गणेश गडकरी, वीर वामनराव जोशी, आचार्य अत्रे, पु. ल. देशपांडे, वसंत कानेटकर, मो. ग. रांगणेकर, वि. वा. शिरवाडकर, विद्याधर गोखले अशा विख्यात नाटककारांनी अनेक नाटय़कृती सादर केल्या. याच धर्तीवर गाजलेल्या 1960 पूर्वीच्या नाटय़कृती पुनश्च रंगभूमीवर सादर व्हाव्यात तसेच त्यांचे जतन व्हावे यासाठी प्रस्ताव मागवण्यात आले आहेत.

  • किमान दहा मराठी नाटकांचे दिग्दर्शन अथवा निर्मिती केलेल्या तसेच किमान तीन नाटकांचे चित्रीकरण केल्याचा अनुभव असणाऱ्या नोंदणीकृत संस्थांना त्यांचे प्रस्ताव पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीकडे 15 ऑगस्ट 2023 पूर्वी प्रत्यक्ष किंवा [email protected] या ई-मेलवर सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या अनुदान योजनेसाठी समिती गठित करण्यात आलेली असून त्याची अधिक माहिती अकादमीच्या संकेतस्थळावर उपलब्ध असल्याचे अकादमीचे प्रकल्प संचालक संतोष रोकडे यांनी दिली.
  • या योजनेमुळे मराठी रंगभूमीवरील जुनी दर्जेदार आणि दुर्मिळ नाटके रसिकांना पुन्हा पाहता येतील. तसेच जतन केल्याने भविष्यातील पिढय़ांनादेखील अभ्यासासाठी हा ठेवा उपयुक्त ठरेल. शिवाय या कलाकृतींचा आस्वाद घेता येईल.