चोरीची मोटारसायकल विक्री करणाऱ्या दोघांना पकडले; कोतवाली पोलिसांची कारवाई

चोरीची मोटारसायकल विक्री करण्यासाठी आलेल्या दोघांना कोतवाली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगळवारी दुपारी 2.30 वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. गजाजन हिलालसिंग मोरे (वय 20, रा. रांजणगाव जि. पुणे, मूळ रा. पिंपळकुटा महादेव ता. मलकापुर जि. बुलडाणा), देवेंद्र विजेंद्र सपकाळे (वय 21,रा. रांजणगाव, जि. पुणे, मूळ रा. कोरे पानाचे ता. भुसावळ जि. जळगाव) अशी आरोपींची नावे आहेत.

केडगाव बायपास चौकात दोनजण विनाक्रमांकाची मोटारसायकल विक्री करण्याकरिता येणार आहेत, अशी माहिती कोतवाली पोलिसांना मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचला होता. दोनजण एका काळया रंगाच्या मोटारसायकलवर संशयास्पदरित्या थांबलेले दिसले. पोलीस अंमलदारांची चाहुल लागताच ते दोघेही तेथुन पळुन जाण्याच्या तयारीत असताना त्यांना पोलीस अमंलदारांनी जागीच पकडले. त्यांच्या ताब्यातील मोटारसायकलबद्दल विचारपूस केली. तसेच मोटारसायकलच्या कागदपत्राची विचारणा केली असता कोणतेही कागदपत्रे नसून एका अनोळखी व्यक्तीने मोटारसायकल नगर येथे विक्री करण्याकरिता दिली होती. त्याकरिता आम्ही नगर येथे आलो आहोत, असे त्यांनी सांगितले. ही मोटारसायकल पोलिसांनी जप्त केली असून त्यांच्याविरुध्द कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार तन्वीर शेख, गणेश धोत्रे, योगेश भिंगारदिवे, अब्दुलकादर इनामदार, सलीम शेख, अभय कदम, संदिप थोरात, अमोल गाढे, कैलास शिरसाठ, अतुल काजळे, सोमनाथ राऊत यांच्या पथकाने केली.