उद्धव ठाकरे वाढदिवस साजरा करणार नाहीत, ‘मातोश्री’वर आज कुणीही गर्दी करू नये 

खालापूरमधील इर्शाळवाडी दुर्घटनेचा दुःखद प्रसंग पाहता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आपला वाढदिवस साजरा करणार नाहीत. त्यामुळे उद्या गुरुवारी वाढदिवसाला कुणीही मातोश्री निवासस्थानी गर्दी करू नये, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी तमाम शिवसैनिकांना केले आहे. 

उद्धव ठाकरे यांचा 27 जुलै हा वाढदिवस शिवसैनिक मोठय़ा उत्साहात साजरा करतात. या दिवशी उद्धव ठाकरे यांचे अभीष्टचिंतन करण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱयातून तसेच देशाच्या विविध भागांतून शिवसैनिक मातोश्री निवासस्थानी दाखल होतात. यंदा मात्र इर्शाळवाडी येथील दरड दुर्घटनेमुळे उद्धव ठाकरे यांनी वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे व वाढदिवशी कुणीही मातोश्री निवासस्थानी येऊ नये, अशी विनंती शिवसैनिकांना केली आहे. 

सामाजिक उपक्रम जरूर राबवा 

इर्शाळवाडीची दुर्घटना मन विषण्ण करणारी आहे. या दुःखदप्रसंगी आपण वाढदिवस साजरा करणार नाही, पण या दिवसाचे औचित्य साधून कोणी सामाजिक उपक्रम साजरे करणार असतील तर त्यांनी ते जरूर करावे, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.