लवकरच वंदे भारत मेट्रो!

वंदे भारत ट्रेननंतर आता वंदे भारत मेट्रो प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे. वंदे भारत मेट्रोची चाचणी जुलैपासून सुरू होणार आहे, तर वंदे भारत स्लीपर ट्रेनची चाचणी पुढील महिन्यापासून सुरू होईल.

वंदे भारत स्लीपर ट्रेन एक हजार किलोमीटरहून अधिक अंतराच्या मार्गांवर धावतील, तर वंदे मेट्रो ट्रेन्स इंटरसिटी ट्रेनच्या धर्तीवर 100-250 किलोमीटरच्या मार्गावर धावणार आहेत. या गाडय़ा दोन प्रमुख शहरांना जोडणार आहेत, अशी माहिती रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱयाने दिली.

12 डबे, मोठे दरवाजे

एका वरिष्ठ रेल्वे अधिकाऱयाने दिलेल्या माहितीनुसार, सध्या सरकार वंदे भारत मेट्रोला प्राधान्य देत आहे. या मेट्रोमध्ये 12 डबे असतील. वंदे भारत मेट्रोचे दरवाजे मोठे असतील. 16 डब्यांची मेट्रो गर्दीच्या मार्गावर चालवली जाणार आहे. जास्तीत जास्त प्रवाशांना उभे राहून प्रवास करता यावा, यादृष्टीने या मेट्रोचे डबे डिझाईन केलेले आहेत.

लवकरच स्लीपर ट्रेन

 खरे तर वंदे भारत स्लीपर ट्रेनसाठी पुढल्या महिन्यात ट्रायल रन सुरू होणार आहे. ट्रायल रन पूर्ण झाल्यानंतर जुलै 2024 मध्ये वंदे भारत स्लीपर ट्रेन रूळावर धावण्याची शक्यता आहे.

वंदे मेट्रो 124 शहरांना जोडणार

वंदे मेट्रो 124 शहरे जोडणार आहे. लखनऊ-कानपूर, आग्रा-मथुरा, दिल्ली-रेवरी, भुवनेश्वर-बालासोर, तिरुपती-चेन्नई असे काही मार्ग असतील.