विजय चौधरी करणार जागतिक पोलीस गेम्समध्ये हिंदुस्थानचे प्रतिनिधित्व

सलग तीन वेळा महाराष्ट्र केसरी विजेतेपद पटकविणारा अप्पर पोलीस अधीक्षक विजय चौधरी हा आगामी वर्ल्ड पोलीस ऍण्ड फायर गेम्स स्पर्धेत कुस्ती खेळासाठी हिंदुस्थानचे प्रतिनिधित्व करणार आहेत. या स्पर्धा 28 जुलै ते 6 ऑगस्ट या कालावधीत कॅनडा येथील विनिपेग या शहरात होणार आहेत. 

चौधरीने 2014, 2015 आणि 2016 अशा सलग तीन वर्षामध्ये अतिशय प्रतिष्ठत अशा महाराष्ट्र केसरी  कुस्ती स्पर्धेचे विजेतेपद पटकाविले होते. मूळचे जळगाव जिह्यातील चाळीसगाव येथील सायगाव बगळीचा रहिवासी असलेला विजय चौधरी सध्या लाचलुचपत प्रतिबंधक शाखा पुणे विभागात येथे अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत आहे. आगामी पोलीस खेळांमध्ये ते 125 किलो वजनी गटात खेळणार असून हिंद केसरी रोहित पटेल त्याचे मार्गदर्शन करतोय.  

सध्या कात्रज येथील मामासाहेब मोहोळ कुस्ती संकुलात कॅनाडियन टाईम झोननुसार त्याचे प्रशिक्षण सुरु आहे. 

मागील वर्षी 2022 साली पुण्याच्या वानवडी येथील एसआरपीएफ ग्राऊंडमध्ये झालेल्या ऑल इंडिया पोलीस गेम्स स्पर्धेत चौधरीने महाराष्ट्र पोलीस दलाचे प्रतिनिधित्व करत असताना सुवर्णपदक मिळवून महाराष्ट्र राज्य पोलीस दलाचे नावलौकिक केले होते. आता येणारी स्पर्धा ही आंतरराष्ट्रीय पातळीवर असून जागतिक पोलिसांसाठी ऑलिंपिकच्या दर्जाची मानली जाते. आजवर केलेल्या कामगिरीपेक्षाही अधिक चांगली कामगिरी या स्पर्धेत करण्याचा मानस चौधरी यांनी व्यक्त केला आहे. हिंदुस्थानला सुवर्णपदक मिळवून देण्यासाठी विजय चौधरीने आपले सर्वस्व पणाला लावले आहे.