ग्रामसभेत एकमुखी ठराव; नेत्यांना गावबंदी

आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय कर्जत तालुक्यातील निमगाव डाकू ग्रामस्थांनी घेतला आहे. आज झालेल्या ग्रामसभेमध्ये एकमुखी निर्णय घेण्यात आला.

कुकडी आणि सीना धरणाचे पाणी उशाला असून, त्याचा फायदा निमगाव डाकू गावास होत नाही. याबाबत खासदार, विद्यमान आमदार आणि पालकमंत्री यासह तालुका प्रशासनाकडे वारंवार ग्रामस्थांनी पाण्याची मागणी करूनदेखील विचार केला जात नाही. याच्या निषेधार्थ आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीवर निमगाव डाकूच्या ग्रामस्थांनी बहिष्कार घालण्याचा एकमुखाने निर्णय घेतला आहे. यासह तालुक्यातील स्थानिक नेत्यांनादेखील गावबंदी करण्याचा इशारा याप्रसंगी देण्यात आला. आज सर्वपक्षीय स्थानिक नेत्यांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर निर्णय घेत आपली भूमिका जाहीर केली.  यावेळी माजी आयुक्त नागेश जाधव, महेश मेहेत्रे, ईश्वर कोठावळे, विजू भोसले, अंकुश भांडवलकर, अशोक महाराज कोठावळे, रोहिणी वाघमारे आणि विमल आरडे आदींनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या.

यावेळी सरपंच बापू आजबे, उपसरपंच रवी कोठावळे, सचिन भवर, माजी सरपंच अजिनाथ जाधव, नानासाहेब आरडे, गणेश शेंडकर, बाळासाहेब शेंडकर, अनिल आरडे, दत्ता भांडवलकर, दीपक गोरे, विलास कांबळे, शहाजी भवर, जालिंदर हिवरे, गणेश भांडवलकर, गणेश शिंदे, राम मुळे, दिगंबर गोंदकर, अजिनाथ भांडवलकर आदी ग्रामस्थ मोठय़ा संख्येने उपस्थित होते. यावेळी ग्रामस्थ एकजुटीच्या घोषणा देण्यात आल्या.