आषाढीसाठी उजनीतून भीमा नदीत विसर्ग सुरू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पंढरपुरात आषाढी वारीचा सोहळा 25 जुलै रोजी संपन्न होणार असून, त्यासाठी उजनी धरणातून भीमा नदीत आज सकाळी 7 वाजता पाणी सोडण्यास सुरुवात करण्यात आली आहे. वीजनिर्मिती केंद्रातून 1600 क्युसेक वेगाने पाणी सोडले जात असून, त्यानंतर त्यात वाढ करण्यासाठी 4 मोरींतून पाणी सोडून त्यात सायंकाळपर्यंत टप्प्याटप्प्याने वाढ केली जाणार आहे.

आज सोडण्यात आलेले पाणी 23 तारखेला पंढरपूर येथे पोहोचेल, असे नियोजन करण्यात आले आहे. पाणी पंढरपूर येथे पोहचल्यावर उजनीतून पाणी बंद करण्यात येणार आहे.

दरम्यान, उजनीतून कालवा व बोगद्यातून शेतीसाठी पाणी सोडण्यात आले. बोगद्यातून 400 क्युसेक व कालव्याद्वारे 200 क्युसेकने पाणी सोडण्यास सुरुवात केली आहे. त्यामध्ये टप्प्याटप्प्याने कालव्याचे पाणी वाढवले जाणार आहे. पाणी मागणीचा जनरेटा वाढल्यामुळे अखेर प्रशासनाला पाणी सोडणे भाग पडले. आता उजनीतून सीना-माढा उपसा सिंचन, बोगदा कालवा योजनेतून पाणी सोडले जात आहे. उजनीमधून कालव्यात सोडलेल्या पाण्यामुळे पिकांना जीवदान मिळणार आहे.