माझी आई फक्त तुला पाहण्यासाठी आलीय, तू शतक ठोक! विंडीजच्या खेळाडूचं ‘स्वप्न’ विराटनं पूर्ण केलं

वेस्ट इंडिजविरुद्ध दुसऱ्या कसोटी लढतीत विराट कोहली याने दमदार शतक ठोकले. विराट कोहली याने 500व्या आंतरराष्ट्रीय लढतीमध्ये 121 धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने 11 वेळा चेंडू सीमापार टोलवला. या खेळीसह त्याने विदेशातील कसोटी शतकांचा दुष्काळही संपवला.

पोर्ट ऑफ स्पेनमध्ये सुरू असलेल्या कसोटीच्या पहिल्या दिवशी विराट कोहली 87 धावांवर नाबाद होता. शतकासाठी त्याला अवघ्या 13 धावांची गरज होती. विराट कोहली याने शतक झळकावे असे प्रत्येक हिंदुस्थानी क्रीडाप्रेमींना वाटते. एवढेच नाही तर वेस्ट इंडिजच्या खेळाडूही हिच इच्छा होती. वाचून आश्चर्य वाटेल पण वेस्ट इंडिजचा यष्टीरक्षक फलंदाज जोशुआ दा सिल्वा यालाही विराटने शतक ठोकावे असे वाटत होते.

विराट कोहली फलंदाजी करत असताना जोशुआ दा सिल्वाने (Joshua Da Silva) त्याच्याशी संवाद साधला होता. माझी आई फक्त तुला पाहण्यासाठी मैदानात आली आहे. मला यावर विश्वास बसत नाहीय. तुझे शतक पूर्ण कर. माझी इच्छा आहे की तू शतक पूर्ण करावे, असे सिल्वा विराटला म्हणाला. हा संवाद मैदानावरील यष्ट्यांमधील माईकमध्ये कैद झाला. यानंतर विराट कोहली याने आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील 76 वे शतक ठोकले आणि वेस्ट इंडिजच्या खेळाडूची इच्छा पूर्ण केली.

आईची भेट

विराट कोहली याने कसोटीतील 29 वे शतक ठोकले तेव्हा जोशुआ दा सिल्वा याची आईही मैदानात उपस्थित होती. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा टीम इंडियाच्या खेळाडूंची बस निघाली तेव्हा सिल्वाची आई बसजवळ आणि तिने विराट कोहलीची भेट घेतली. तसेच त्याला करकचून मिठी मारत त्याच्यासोबत फोटोही काढले. यावेळी त्यांचे डोळेही पाणावले. याचा व्हिडीओ पत्रकार विमल कुमार यांनी शेअर केला आहे.

कोहली सर्वोत्तम फलंदाज

विराट कोहली आमच्या आयुष्यातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक आहे. त्यामुळे त्याला आणि माझ्या मुलाला एकत्र खेळताना पाहणे, त्याला भेटणे माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट असल्याचे जोशुआ दा सिल्वाची आई म्हणाली.