विंडीजने रोखला हिंदुस्थानचा विजयरथ; विराट, रोहितच्या गैरहजेरीत टीम इंडियाचा फ्लॉप शो

लागोपाठ नऊ लढतींत पराभव पत्करावा लागल्यानंतर वेस्ट इंडीजने अखेर दुसऱया एकदिवसीय क्रिकेट सामन्यात बाजी मारत हिंदुस्थानचा विजयरथ रोखला. विराट कोहली व रोहित शर्मा यांच्या गैरहजेरीत खेळणाऱया टीम इंडियावर यजमान संघाने 6 गडी राखून विजय मिळविला. नाबाद 63 धावांची खेळी करणारा कर्णधार शाई होप या विजयाचा मानकरी ठरला. या विजयासह विंडीजने तीन सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी महत्त्वपूर्ण बरोबरी साधली.

हिंदुस्थानकडून मिळालेले 182 धावांचे लक्ष्य वेस्ट इंडीजने 36.4 षटकांत 4 फलंदाजांच्या मोबदल्यात सहज पूर्ण केले. विंडीजकडून काईल मेयर्स (36), शाई होप (नाबाद 63) व किसी कार्टी (नाबाद 48) यांनी उपयुक्त फलंदाजी केली. हिंदुस्थानकडून शार्दुल ठाकूरने 3, तर कुलदीप यादवने एक बळी टिपला.

त्याआधी, नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना हिंदुस्थानने 40.5 षटकांत 181 अशी असुरक्षित धावसंख्या उभारली. इशान किशन (55) व शुभमन गिल (34) यांनी 16.5 षटकांत 90 धावांची सलामी देत हिंदुस्थानला आश्वासक सुरुवात करून दिली होती. मात्र हे दोघे बाद झाल्यानंतर हिंदुस्थानचा डाव गडगडला. संजू सॅमसन (9), अक्षर पटेल (1) व कर्णधार हार्दिक पंडय़ा (7) ही आघाडीची फळी अपयशी ठरली. त्यानंतर सूर्यकुमार यादव (24), रवींद्र जाडेजा (10) व शार्दुल ठाकूर (16) यातील कोणालाही मोठी खेळी करता न आल्याने हिंदुस्थानला आव्हानात्मक धावसंख्या उभारता आली नाही. विंडीजकडून गुडाशेक मोती व रोमारियो शेफर्ड यांनी 3-3 बळी टिपले. अल्झारी जोसेफने 2 फलंदाज बाद केले, तर जेडेन सिल्स व यानिक पॅरिया यांना 1-1 बळी मिळाला.

द्रविडकडून संघ बदलाचे समर्थन

टीम इंडियाचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी रोहित शर्मा व विराट कोहली यांना विश्रांती देण्याच्या निर्णयाचे समर्थन केले. या दिग्गज खेळाडूंना विश्रांती दिली नसती तर विश्वचषक स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर संघाच्या मोर्चेबांधणीबाबतचे प्रश्न कसे समजले असते. आमचे लक्ष्य सध्या आशियाई चषक व विश्वचषक स्पर्धेसाठीच्या संघबांधणीवर आहे. त्यामुळे वेस्ट इंडीजविरुद्ध दुसऱया वन डेत हरलो असलो तरी तिसऱया सामन्यातही प्रयोग करण्यासाठी कचरणार नाही. विश्वचषक स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर प्रयोग करण्याची ही आमच्यासाठी अखेरची संधी होय. टीम इंडियाचे काही खेळाडू जायबंदी आहेत. ते सध्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत (एनसीए) सराव करीत आहेत. यातील काही खेळाडू हे विश्वचषक स्पर्धेपूर्वी फिट होतील, मात्र आमच्याकडे अधिक वेळ उरलेला नाहीये. जर जायबंदी खेळाडू फिट झाले नाही तर आम्हाला इतर खेळाडूंना संघात घ्यावे लागणार आहे. त्यामुळे या बाकावरील खेळाडूंना आताच जास्तीत जास्त संधी देण्याची आमची रणनीती आहे, असेही द्रविड यांनी स्पष्ट केले.