धोनी आणि कोहलीसोबत खेळूनही काही शिकला नाहीस! हार्दिक पांड्या स्वार्थी असल्याची क्रिकेटप्रेमींची टीका

वेस्ट इंडिजविरुद्ध लागोपाठ दोन टी-२० सामन्यांत पराभवाचे तोंड पाहायला लागल्यानंतर टीम इंडियाला तिसऱ्या सामन्यात अखेर विजय मिळाला. पाच सामन्यांच्या मालिकेतील तिसऱ्या सामन्यात टीम इंडियाने 7 विकेट्सने विजय मिळवला . भारतीय संघाकडून या सामन्यात सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा यांनी अप्रतिम फलंदाजी केली. कर्णधार हार्दिक पंड्या याने 15 चेंडूत 20 धावा केल्या आणि तो शेवटपर्यंत नाबाद राहिला.

या सामन्यात हार्दिकने विजयी फटका मारला मारत तिसऱ्या T20 मध्ये हिंदुस्थानी संघाला विजय मिळवून दिला. वेगवान खेळून, संघासाठी विजयी फटका मारूनही पांड्यावर टीका होत आहे. हार्दिक पांड्या हा प्रचंड स्वार्थी वागल्याची टीका या सामन्यानंतर केली जाऊ लागली आहे.  हार्दिक पांड्या हा विराट कोहली आणि महेंद्रसिंग धोनी  यांच्यासोबत इतकी वर्ष दिवस खेळला आहे तो त्यांच्याकडून संघासाठी त्याग करण्याची वृत्ती शिकू शकला नाही अशी त्याच्यावर टीका केली जात आहे.

प्रकरण काय आहे ?

तिसऱ्या टी-20 सामन्यात यजमान वेस्ट इंडिज संघाने प्रथम फलंदाजी करताना भारतासमोर विजयासाठी 160 धावांचे लक्ष्य ठेवले होते . दोन सामने गमावलेल्या हिंदुस्थानी संघाने हा सामना गमावला असता तर मालिका गमावण्याचा धोका होता. लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियाच्या सलामीवीरांना पुन्हा निराश केले.  सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा यांनी मिळून टीम इंडियाचा डाव सांभाळला. एकीकडे सूर्यकुमार यादव वेगवान धावा करत असताना तिलक वर्माने त्याला उत्तम साथ दिली. सूर्यकुमार यादव 84 धावा करून बाद झाला. यानंतर कर्णधार हार्दिक पांड्या फलंदाजीला आला.

पांड्या मैदानात आला तेव्हा तिलक वर्मा हा अर्धशतकाच्या उंबरठ्यावर होता. भारतीय संघ 160 धावांचे लक्ष्य सहज गाठेल असे वाटत होते . हार्दिकने येताच आकर्षक फटकेबाजी केली. टीम इंडियाने 17.4 षटकात वेस्ट इंडीजच्या धावसंख्येशी बरोबरी केली. त्यावेळी तिलक वर्मा नॉन स्ट्राइकवर 49 धावांवर होता. त्याला अर्धशतक पूर्ण करण्याची संधी होती. हार्दिक पांड्याने एकही धाव न घेता उरलेले चेंडू खेळून तिलक वर्माला स्ट्राईक दिला असता तर तिलक वर्माला अर्धशतक पूर्ण करता आलं असतं. मात्र पांड्याने असं न करता 17व्या षटकातील पाचव्या चेंडूवर षटकार ठोकून सामना संपवला . सामना चुरशीचा होता किंवा टीम इंडियाला एका षटकात 15 किंवा 20 धावा करायच्या होत्या असी परिस्थिती नव्हती,  टीम इंडियाकडे सामना जिंकण्यासाठी पुरेसे चेंडू शिल्लक होते, तरीही पांड्याने तिलक वर्माला अर्धशतक करण्याची संधी दिली नाही.

टीम इंडिया जिंकल्याचा तिलक वर्माच्या चेहऱ्यावर आनंद होता, मात्र अर्धशतक पूर्ण करू न शकल्याची त्याला खंत त्याच्या मनात नक्कीच असावी. याच कारणामुळे हार्दिक पांड्यावर त्याच्या ज्युनियर खेळाडूंसोबत स्वार्थीपणे वागत असल्याची टीका होत आहे.

धोनीने विराटला दिली होती संधी

2014 च्या T20 विश्वचषकामध्ये महेंद्रसिंग धोनीने विराट कोहलीसाठी धाव घेतली नव्हती त्याची आठवण क्रिकेटप्रेमींनी करून दिली . धोनी त्यावेळी संघाचा कर्णधार होता आणि सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सामना होता. टीम इंडियाला 7 चेंडूत फक्त एक धाव हवी होती आणि धोनी स्ट्राइकवर होता आणि कोहली 43 चेंडूत 68 धावा करून खेळत होता . धोनीने 19व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर एकही धाव घेतली नाही कारण विजयी शॉट कोहलीने मारावा अशी धोनीची इच्छा होती. कारण त्याने केलेल्या सुरेख फलंदाजीमुळे हिंदुस्थानी संघ विजयाच्या उंबरठ्यावर येऊन उभा राहिला होता. धोनीने 19 वे षटक एकही धाव न घेता पूर्ण केले आणि कोहलीला स्ट्राइक दिला. या सामन्यातील विजयी फटका कोहलीने मारला होता. धोनीच्या या कृतीचे खूप कौतुक झाले होते.

कोहलीनेही गिरवला धोनीचा कित्ता

महेंद्रसिंग धोनीच नाही तर विराट कोहलीनेही आपल्या सहकारी खेळाडूंसाठी धाव न घेऊन सर्वांची मने जिंकली होती. कोहलीने इंडियन प्रीमियर लीगमध्ये खिलाडूपणाचे दर्शन घडवले होते. त्याच्या सहकारी ख्रिस गेल 98 धावांवर फलंदाजी करत होता. हा सामना केकेआरविरुद्ध होता आणि आरसीबीला विजयासाठी दोन धावांची गरज होती. संघाला विजय मिळवून देत असतानाच ख्रिस गेलने त्याचे शतकही पूर्ण करावे असे कोहलीला वाटत असल्याने त्याने गेल याला स्ट्राईक मिळेपर्यंत एकही धाव घेतली नाही. यानंतर गेलने चौकार मारत आपले शतक पूर्ण केले आणि संघाला विजयही मिळवून दिला.