आधी चालकाला धक्का, मग गाडीवर ताबा; विमान पकडण्यासाठी उबर चोरणाऱ्या महिलेवर गुन्हा दाखल

 

अनेक चित्रपटांमध्ये आपण पाहिले असेल की प्रियकर आपल्या प्रेयसीला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहचवण्यासाठी कार चालकाला बाजूला करतो आणि त्याच्या जागेवर बसून सुसाट गाडी चालवतो. जेणेकरुन त्याच्या प्रेयसीला वेळेत पोहोचता येईल. चित्रपटाला साजेशी अशीच एक घटना अमेरिकेच्या टेक्सासमध्ये घडली आहे. येथे एका महिलेने उबर चालकालाच बाजूला सारून स्वत: कारचा ताबा घेतला आणि इश्चीत स्थळी पोहोचली. त्यामुळे या महिलेवर चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नुश्या अफकामी (27) असे या महिलेचे नाव आहे. नुश्या 10 डिसेंबर रोजी सकाळी तिच्या हॉटेलमधून विमानतळावर जाण्यासाठी निघाली होती. विमानतळावर वेळेत पोहोचण्यासाठी तिने उबर बुक केली. उबर चालक फारच हळू गाडी चालवत असल्यामुळे विमानतळावर पोहोचायला उशीर होईल आणि विमान चुकेल अशी भीती नुश्याला होती. यासंदर्भात तिने चालकाला कल्पनाही दिली. परंतु चालकाने गाडीचा वेग वाढवण्यास नकार दिला. त्यामुळे संतापलेल्या नुश्याने उबर चालकाचा फोन गाडीच्य़ा बाहेर फेकला. त्यामुळे चालकाने घाबरुन गाडी थांबवली आणि फोन उचलण्यासाठी गाडीबाहेर पडला. तेवढ्या वेळेत या महिलेने चालकाला तिथेच सोडले आणि गाडीत बसून गाडी घेउन गेली.

मला विमानतळावर जायला उशीर होत आहे. त्यामुळे मी तुमची गाडी घेऊन जात आहे. तिथे गेल्यावर ही गाडी मी विमानतळावरच ठेवेन असे गाडी घेउन जात असताना नुश्याने चालकाला सांगितले. विमानतळावर पोहोचताच नुश्याने ती गाडी टर्मिनलसमोर सोडली आणि पटकन विमानतळावर प्रवेश केला. एवढ्यावरच ती थांबली नाही तर तिने एअरपोर्ट स्टोअरमध्ये चालकाचे क्रेडिट कार्ड वापरून थोडी खरेदी देखील केली.

दरम्यान आपली गाडी घेउन गेलेल्या महिलेविरुद्ध चालकाने पोलिसांकडे तक्रार केली. त्यामुळे पोलिसांनी लगेचच त्या महिलेला विमानतळावरुन ताब्यात घेतले. उबर चोरल्याप्रकरणी आणि क्रेडिट कार्ड वापरल्यामुळे या महिलेवर गुन्हा दाखल करुन तिला अटक करण्यात आली आहे.