यशस्वी जैसबॉल, जैसवालच्या झंझावाताने बॅझबॉलला ठोकले; 257 चेंडूंत 179 धावांची अभेद्य खेळी

हिंदुस्थानचा युवा सलामीवीर यशस्वी जैसवाल आज इंग्लिश गोलंदाजांसमोर वॉलसारखा उभा राहिला. हिंदुस्थानच्या आघाडीवीरांनी आजही निराशा केली असली तरी त्याने इंग्लंडच्या ‘बॅझबॉल’ क्रिकेटला एकहातीच पह्डून काढत नाबाद 179 धावा ठोकल्या. ‘बॅझबॉल’पुढे यशस्वीच्या ‘जैसबॉल’ खेळाने दुसऱया कसोटीचा पहिला दिवस गाजवला आणि संघाला 6 बाद 336 अशी दमदार मजल मारून दिली. पहिल्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा जैसवालसोबत अश्विन 5 धावांवर खेळत होता.

पहिल्या हैदराबाद कसोटीवर हिंदुस्थानचे वर्चस्व होते, पण इंग्लंडच्या आक्रमक खेळाच्या ‘बॅझबॉल’ शैलीने अचानक डोकेवर काढत हिंदुस्थानवर मात करण्याची करामत करत हैदराबाद जिंकले होते. हैदराबादचा पराभव हिंदुस्थानी संघाच्या जिव्हारी लागला होता. त्यामुळे विशाखापट्टणमवर पुनरागमनाच्या निर्धाराने उतरलेल्या हिंदुस्थानला आज यशस्वीच्या झुंजार फलंदाजीचे बळ लाभले. फक्त हिंदुस्थानचा एकही आघाडीवर आपली भूमिका प्रभावीपणे निभावू शकला नाही.

एकटा यशस्वी लढला

हिंदुस्थानच्या आघाडीवीरांची तीच रडकथा दिसली. फक्त आज फरक इतका होता की, यशस्वी झुंजार फलंदाजासाठी आणि चिनी भिंतीसारखा उभा राहिला आणि त्याने इंग्लिश आक्रमणाला स्वतःवर स्वार होऊ दिले नाही. रोहित शर्माच्या (14) फलंदाजीला आजही पन्नाशीचे दिव्य गाठता आले नाही. तसेच हिंदुस्थानच्या शुबमन गिल (34), श्रेयस अय्यर (34), पदार्पणवीर रजत पाटीदार (32), श्रीकर भरत (17) आणि अक्षर पटेल (27) या एकाही फलंदाजाला धावांची चाळिशीही गाठता आली नसली तरी ‘जैसवॉल’ने पाच चाळिशीपेक्षा मोठय़ा भागीदाऱया रचल्या. त्यात तीन अर्धशतकी भागी होत्या. एका बाजूने हिंदुस्थानी फलंदाज बाद होत असताना जैसवाल इंग्लिश गोलंदाजीला ओळखण्यात यशस्वी ठरला आणि त्याने चांगल्या चेंडूंना आदर तर खराब चेंडूंना सीमारेषेपलीकडे पाठवले. त्यांचा हाच संयमीपणा हिंदुस्थानला पहिल्या दिवसावर वर्चस्व मिळवून देण्यात यशस्वी ठरला.

आज यशस्वीचा खेळ पाहून ‘बॅझबॉल’ऐवजी ‘जैसबॉल’चा घणाघात पाहण्याचे भाग्य हिंदुस्थानी क्रिकेटप्रेमींना लाभले. त्याला कुणाचीही अपेक्षित साथ लाभली नाही, पण त्यांच्या फलंदाजीने साऱया फलंदाजांचे अपयश झाकोळून टाकले. तो आज फेकलेल्या 559 चेंडूपैकी 257 चेंडू खेळला आणि त्याने 336 पैकी 179 धावा केल्या. म्हणजेच तो निम्म्यापेक्षा कमी चेंडू खेळला आणि त्याने निम्म्यापेक्षा अधिक धावा चोपल्या. त्याने आपल्या फलंदाजीत 17 चौकार आणि 5 खणखणीत षटकार ठोकत इंग्लिश गोलंदाजांना हैराण केले.

द्रविड सर आणि रोहितभाईमुळेच ही खेळी

राहुल द्रविड सर आणि रोहितभाई शर्माने दिलेल्या आत्मविश्वासामुळेच मी या खेळीला मोठय़ा खेळीचे रूप देऊ शकलो आणि शेवटपर्यंत खेळपट्टीवर उभा राहू शकलो. मला आता या खेळीला द्विशतकाचा मान द्यायचाय. संघासाठी मला शेवटपर्यंत खेळायचेय आणि मी उद्या सकाळी नव्याने माझ्या खेळीला पुढे नेणार, असा विश्वास यशस्वी जैसवालने दिवसाचा खेळ संपल्यानंतर व्यक्त केला.

इंग्लंडचा ‘बॅझबॉल’ ‘जैसवॉल’समोर निष्प्रभ

आज इंग्लंडचा ‘बॅझबॉल’ हा ‘जैसबॉल’समोर पुरता अपयशी ठरला. इंग्लडने पहिल्या कसोटीप्रमाणे आजही चार फिरकीवीर खेळवले. पण कोणताही आंतरराष्ट्रीय अनुभव नसलेल्या 20 वर्षीय शोएब बशीरला पदार्पणाची संधी दिली. तसेच 40 वर्षीय जेम्स अॅण्डरसनलाही खेळवले. आज इंग्लंडच्या गोलंदाजांना फारसे यश लाभले नसले तरी पाकिस्तानी वंशाच्या शोएब आणि रेहान अहमद या युवा गोलंदाजांनी प्रत्येकी दोन विकेट टिपल्या.

चौथा मुंबईकर संघाबाहेरच

रोहित शर्माने आज नाणेफेक जिंकल्यानंतर जाहीर केलेल्या संघनिवडीत मुकेश कुमारचे नाव ऐकून साऱयांच्याच भुवया उंचावल्या. मोहम्मद सिराजला विश्रांती देत चौथा फिरकीवीर खेळवण्याची चर्चा असताना मुकेश कुमारला संधी देण्यात आली. तसेच सरफराझ खानला पदार्पणाची संधी न देता रजत पाटीदारची निवड करण्यात आली. त्यामुळे आज हिंदुस्थानी संघात रोहित, जैसवाल आणि अय्यरच्या साथीला चौथा मुंबईकर आणि चौथा फिरकीवीर संघात दिसलाच नाही.