झेप… गरजूंच्या शिक्षणासाठी!

>>अनघा सावंत

‘शिक्षणातून उत्क्रांती’ हे ब्रीदवाक्य अवलंबून समाजातील वंचित तसेच गरजू मुलांसाठी सातत्याने विविध शैक्षणिक उपक्रम राबवत ‘झेप प्रतिष्ठान’ने नावाप्रमाणेच मोठी सामाजिक झेप घेतली आहे.

एक वही, एक पेन

‘झेप प्रतिष्ठान’ गेल्या पाच वर्षांपासून गणेशोत्सवात ‘एक वही, एक पेन’ हा अतिशय महत्त्वपूर्ण उपक्रम राबवते. या उपक्रमांतर्गत भाविकांना हार, फुले, फळे यांसोबतच ‘एक वही आणि एक पेन’ आणण्याचे आवाहन केले जाते. गणेशोत्सवात जमा झालेली ही मदत आदिवासी पाडय़ावरील मुलांना पोहोचवण्यात येते.

शिक्षण मानवी जीवनाचा पाया बनवते, तसेच व्यक्तीला त्याच्या जीवन प्रवासाला आकार देण्यास सक्षम करते यावर ठाम विश्वास असणाऱया विकास धनवडे यांनी 2011 मध्ये ‘झेप प्रतिष्ठान’ या संस्थेची स्थापना केली.

शालेय शिक्षण घेत असताना विकास यांना अनेक मोठय़ा प्रसंगांना सामोरे जावे लागले. ते दहावीत असताना त्यांच्या वडिलांची पंपनी अनपेक्षितपणे बंद पडली आणि त्यांच्या कुटुंबावर आर्थिक संकट कोसळले. त्यातच त्यांच्या आईचेही अकस्मात निधन झाल्यामुळे कुटुंबावर बिकट परिस्थिती ओढवली. आर्थिक अडचणींमुळे त्यांना पुस्तके विकत घेणे परवडत नव्हते. मित्रांकडून पुस्तके उसनी घेऊन त्यांनी अभ्यास केला. मात्र जिद्द, चिकाटी आणि जीवनात प्रगती करण्याच्या इच्छाशक्तीने त्यांनी सगळय़ा अडथळय़ांवर मात केली. सध्या परदेशातील एका मोठय़ा पंपनीत व्यवस्थापक म्हणून ते कार्यरत आहेत. ‘झेप प्रतिष्ठान’विषयी ते म्हणाले, ‘‘अनेक मुलांना आर्थिक अडचणींमुळे मूलभूत शिक्षणापर्यंत पोहोचता येत नाही. अशा मुलांना मदतीचा हात पुढे करून त्यांना त्यांचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी आणि गरिबीच्या चक्रातून मुक्त होण्यासाठी आवश्यक संसाधने उपलब्ध करून देऊन या समस्येचे निराकरण करण्याचा संस्थेचा उद्देश आहे.’’

गेल्या 12 वर्षांत संस्थेने आदिवासी पाडय़ातील जवळ जवळ पाच हजार मुलांना शैक्षणिक साहित्य पुरवले आहे. कोविड काळानंतर शहरी भागातही अनेक मुलांना शैक्षणिक मदतीची आवश्यकता आहे हे निदर्शनास आल्यावर काही मराठी शाळांतील गरजू मुलांना शैक्षणिक साहित्याची मदत केली आहे. अनाथ मुलांना तसेच एकल पालकत्व निभावणाऱया गरीब महिलांना मुलांच्या शिक्षणासाठी संपूर्ण शहानिशा करून संस्था नेहमीच मदत करत आली आहे.

संस्था मुलुंड येथील कचरावेचक महिलांना दर तीन महिन्यांनी सॅनिटरी नॅपकिन पुरवते. तसेच त्यांना स्वच्छतेचे महत्त्व आणि आरोग्यविषयक माहिती देते. जव्हारच्या आदिवासी पाडय़ात संस्थेने आजपर्यंत 13 आरोग्यविषयक शिबिरे घेतली असून  एक आरोग्यविषयक पेंद्रही उभारले गेले आहे.

संस्थेतर्फे नववर्षाच्या सुरुवातीलाच कर्जत येथील आदिवासी कातकरी समाजातील नांदगाव झुगरेवाडी येथील शाळा दत्तक  घेण्यात आलेली आहे. या शाळेत अद्ययावत विज्ञान प्रयोगशाळा, संगणक कक्ष, लायब्ररी, यूपीएससी/एमपीएससी कक्ष, मुला-मुलींसाठी शौचालय, पुस्तके, वह्या, क्रीडा साहित्य, व्यायाम शाळा, आरोग्य शिबिरे आणि विविध उपक्रम राबवले जाणार आहेत. या शाळेला आदर्श शाळा म्हणून दर्जा मिळवून देण्यासाठी आम्ही सतत प्रयत्नशील राहू, असे विकास यांनी सांगितले. संस्था जव्हार येथे  दिवाळीत  जवळपास 1100 लोकांना फराळ, नवीन कपडे, वह्या- पुस्तके बूट-चपला आदी देते.