अनंत अंबानी यांनी 15 कोटी रुपये दिले! माजी राज्यपाल कोश्यारी यांची कबुली

नैनितालमधील पार्वती प्रेमा जगती सरस्वती विहार शाळेसाठी अनंत अंबानी यांनी 15 कोटी रुपये दिले, अशी कबुली महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज दिली.

एका शाळेच्या नावावर महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी 15 कोटी रुपयांची देणगी घेतल्याचा आरोप त्यांच्यावर एका पत्राद्वारे करण्यात आला होता. हे पत्र आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांना मिळाले होते. त्यामुळे महाराष्ट्रच नव्हे तर उत्तराखंडमध्ये एकच खळबळ उडाली होती. यासंदर्भात महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी खुलासा करताना 15 कोटी मिळाल्याचे कबूल केले. मी महाराष्ट्राचा राज्यपाल होतो. एके दिवशी उद्योगपती मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत माझ्याकडे आला. आम्ही परस्परांशी बोललो. नैनितालमध्ये चाळीस वर्षांपासून पार्वती प्रेमा सरस्वती विहार ही नामांकित शाळा आहे. लोकांच्या मागणीनुसार आणखीनही शाळा उघडल्या जात आहेत. मी अनंत अंबानी यांना सांगितले की, शाळेसाठी निधी द्या. ज्याचा फायदा ग्रामीण भागाला होईल. त्यानंतर त्यांनी 15 कोटी रुपये दिले असे भगतसिंह कोश्यारी यांच्या वतीने नमूद करण्यात आले आहे.

शाळेच्या नावावर संपत्ती जमा केल्याचा आरोप

माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यपालपदाचा गैरवापर करून उत्तराखंडमधील शाळेच्या नावावर संपत्ती जमा केली. या शाळांमध्ये 100 मुलेही शिकत नाहीत. अशा शाळांसाठी मोठय़ा प्रमाणावर देणग्या गोळा केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. या सर्व आरोपांच्या पार्श्वभूमीवर भगतसिंह कोश्यारी यांनी स्पष्टीकरण दिले आहे.