विज्ञान – रंजन – पहिली भूमिगत रेल्वे

>> विनायक

तरुण वयात अनेक गडकिल्ले पाहताना कुतूहलाचे जे विषय असायचे त्यातील एक म्हणजे इतिहासकालीन भुयारं. मोठे राजवाडे, वाडे, गडकिल्ले आदी ठिकाणीदेखील अशा भूमिगत मार्गांची बांधणी होत असे. आधुनिक काळातील यंत्रयुगातही हे भूमिगत पिंवा भुयारी मार्गांचं महत्त्व कमी झालं नाही, तर ते वाढतच गेलेलं दिसतं. अगदी 1970 च्या दशकापासून मुंबईतल्या संभाव्य भुयारी रेल्वेची चर्चा कानी यायची. आता ती होईलही. त्याआधी देशात पहिली भुयारी रेल्वे कोलकाता येथे सुरू झाली. ती पाहण्याचं कुतूहल पूर्ण झालं. सलग काही किलोमीटर भूपृष्ठाखालून जात असताना वर एक गजबजलेलं महानगर आहे याची कल्पनाच तेव्हा चकित करणारी वाटायची. आताच्या पिढीला याबाबत ती ‘टेो-सॅव्ही’ असल्याने, आश्चर्यचकित व्हावंसं वाटणार नाही, पण जगातली पहिली भूमिगत आगगाडी खरोखरच वाफेच्या इंजिनावर चालणारी होती आणि ती 1863 मध्येच इंग्लंडमध्ये अवतरली हे जाणून घेतल्यावर काहीसा विस्मय वाटू शकेल.

161 वर्षांपूर्वी संपूर्ण रेल्वेगाडी जमिनीखालून चालवण्याचं स्वप्न तसं सोपं नव्हतं. पण इंग्लिशमध्ये म्हणतात ना, ‘व्हेअर देअर इज विल देअर इज वे’ (इच्छा असेल तर मार्ग सापडतो.) संशोधकांना 1863 मध्ये त्यांच्या इच्छाशक्तीने भुयारी ‘रेल्वे-मार्ग’ दाखवला! अशी ट्रेन असावी याचा विचार 1830 मध्येच सुरू झाला होता. कारण तोपर्यंत 1825 मध्ये सुरू झालेल्या पहिल्या रेल्वे प्रवासाने चांगला प्रतिसाद मिळवला होता. 1854 मध्ये परवानगी मिळताच, लंडन शहरात अशी ट्रेन सुरू करण्यापूर्वी, तशीच भूगर्भीय रचना असलेल्या किबल्सवर्थ या गावात एक बोगदा खणण्यात आला. तिथे रुळ टाकून भूमिगत रेल्वेचे पहिले प्रयोग झाले. त्यातून अशी ट्रेन लंडनसारख्या गर्दीच्या शहराखालून चालवली तर किती पंपनं निर्माण होतील नि त्याचा काय परिणाम होईल याचा अंदाज आला. परंतु जमिनीखाली 40 ते 50 मीटरवर बोगदा खणला तर भूपृष्ठावर त्याची जाणीवही होत नाही हे लक्षात आलं. शिवाय हा बांधीव बोगदा होता.

आता प्रश्न होता तत्कालीन इंजिनाच्या इंधनाचा. तोपर्यंत विजेवर चालणाऱया ट्रेन नसल्याने वाफेवर चालणारी ट्रेन दगडी कोळशाच्या इंधनावर चालणार होती. तीही बंद बोगद्यातून. अशी ट्रेन न्यायची तर धुराने काsंडमारा होणार नाही याची काळजी घेणं गरजेचं होतं.

हे सर्व सोपस्कार झाल्यावर 10 जानेवारी 1863 दिवस उजाडला. लोकांमध्ये कमालीची उत्सुकता होती. पॅरिंग्टन ते फॅरिंग्टन या मार्गावर जगातली पहिली, वाफेचं इंजिन आणि डब्यांमध्ये गॅसचे दिवे असलेली भुयारी ट्रेन धावली. लवकरच या ट्रेनच्या प्रवासाचं कुतूहल इतपं पसरलं की 38 हजार लोकांनी भुयारी प्रवास करण्याचा आनंद उपभोगला.

तोपर्यंत ही ट्रेन लंडनच्या मध्यवर्ती भागात नव्हती. 1884 मध्ये लंडन टय़ुब-रेल्वेचं आतलं वर्तुळ (इनर-सर्कल) पूर्ण झाल्यावर ती लंडनच्या महत्त्वाच्या भागामध्ये विस्तारली. सुरुवातीला दहा फूट आणि नंतर सोळा फूट व्यासाचे बोगदे खणत ही ट्रेन आता एकूण 402 किलोमीटरचा प्रवास करते. 607 चौरस किलोमीटर क्षेत्रात लंडन टय़ुबचा व्याप वाढलेला आहे. 1890 नंतर या भूमिगत ट्रेनची इंजिनं विजेवर चालू लागली. डब्यात पंखे आले. कालांतराने त्या एसी (वातानुकूल) झाल्या.

अगदी सुरुवातीला धुराचं इंजिन आणि उघडय़ा खिडक्या यामुळे प्रवाशांना त्रास व्हायचा. डोळे चुरचुरणे, दमा उफाळणे वगैरे असे त्रास व्हायचे. गंमत म्हणजे धूर ‘फिल्टर’ करून श्वासात जाऊ नये म्हणून पुरुषांनी दाढी-मिशा वाढवाव्या अशाही सूचना आल्या! तर बेकरलू स्टेशनच्या नावांची संभावना ‘गटर टायटल’ अशी केली गेली.

सुमारे 400 किलोमीटर धावणाऱया या ‘टय़ुब’चं सर्वांत खोलवरचं स्टेशन 58 मीटर भूगर्भात आहे. त्याचं नाव ‘हॅम्प्सटीड.’ आता 11 मार्गांवर जगातल्या या पहिल्या ‘टय़ुब’ रेल्वेचा कारभार चालतो. ‘टय़ुब’ हे ब्रिटिश लोकांनी दिलेलं या रेल्वेचं टोपणनाव आहे. खरं नाव ‘लंडन अंडरग्राऊंड’ असं असून त्यातून दरवर्षी 1 अब्ज 26 हजार प्रवासी ये-जा करतात. 112 भूमिगत स्थानकांवरून हे दळणवळण (यातायात नव्हे!) चालते. 163 वर्षांचा हा प्रवास 92 टक्के तिकिटांच्या उत्पन्नावर चालतो. आता तर ऑइस्टर कार्डाद्वारे टय़ुब, ट्रेन, ट्राम, बस असा एकत्रित पास प्रवाशांना मिळतो.

या रेल्वेचे अपघात फार नाहीत. दरवाजा बंद होताना कोणाचा कोट अडकणं पिंवा ओलसर प्लॅटफॉर्मवरून ट्रकवर पडल्याने कुणी जायबंदी होणं असे प्रकार घडलेत, पण 28 फेब्रुवारी 1975 रोजी मूरगेठ स्टेशनजवळ एक टय़ुब-ट्रेन ट्रक सोडून बोगद्याच्या भिंतीला धडकली. त्यात 43 जणांचा मृत्यू ओढवला. हा आजवरचा सर्वात मोठा अपघात असेल.

2013 मध्ये ‘टय़ुब’ला 150 वर्षं पूर्ण झाली तेव्हा एक विशेष म्हणजे ‘धुराचं इंजिन असलेली ट्रेन भुयारातून धावली आणि 1863 च्या स्मृतींना उजाळा मिळाला.