मिंधेंच्या पायाखालची जमीन सरकली, शिवसैनिकांवर दबावतंत्र; एम.के. मढवी यांना ठाणे पोलिसांकडून अटक

ठाणे लोकसभा मतदारसंघात उमेदवार मिळत नसलेल्या मिंधे गटाने आता रडीचा डाव सुरू करत शिवसैनिकांवर दबाव आणण्यास सुरुवात केली आहे. नवी मुंबईतील शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे ज्येष्ठ नगरसेवक एम.के. मढवी यांना आज ठाणे पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकाने कथित खंडणीप्रकरणी अटक केली. मढवी यांच्यावर दबाव निर्माण करण्यासाठी गेल्या काही महिन्यांपूर्वी त्यांना खोट्या गुन्ह्यात तडीपार करण्यात आले होते. मात्र त्यानंतरही मढवी झुकले नाहीत. त्यामुळे आज त्यांच्यावर थेट अटकेची कारवाई करण्यात आली.

ऐरोलीमध्ये रस्त्यात केबल टाकणार्‍या एका ठेकेदाराकडे मढवी यांनी खंडणी मागितल्याचा तथाकथित आरोप पोलिसांनी केला आणि आज त्यांच्यावर थेट अटकेची कारवाई करण्यात आली. मढवी यांना आपल्या गटात ओढण्यासाठी मिंधे गटाने सुरुवातीपासूनच जोरदार फििंल्डग लावली होती. मात्र ते कोणत्याच दबावाला झुकले नाहीत. मिंधे गटाकडून होत असलेल्या छळवणुकीचे त्यांनी पत्रकार परिषद घेऊन वस्त्रहरण केले होते. त्यामुळे त्यांच्यावर थेट तडीपारीची कारवाई करण्यात आली होती. या कारवाईवरून न्यायालयाने नवी मुंबई पोलिसांना जोरदार फटकारे लगावले होते. आज मात्र त्यांच्यावर तथाकथित खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला. रात्री उशिरा त्यांच्यावर अटकेची कारवाई झाली. हा प्रकार नेमका काय आहे याबाबत पोलिसांनी उशिरापर्यंत पत्रकारांना कोणतीही माहिती न देता लपवाछपवी केली. . दरम्यान, मढवी यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती नवी मुंबईत वार्‍यासारखी पसरल्यानंतर मढवी यांच्या ऐरोलीतील कार्यालयासमोर शिवसैनिक आणि महाविकास आघाडीच्या पदाधिकार्‍यांनी मोठी गर्दी केली. यावेळी त्यांनी राज्यातील खोके सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करीत या सूडाच्या राजकारणाचा निषेध केला.