नॉनव्हेज खात असाल तर घर मिळणार नाही; विलेपार्लेत गुजराती बिल्डरने मराठी माणसाला घर नाकारले

अलीकडेच एका गुजरातच्या कंपनीने गिरगावातील कार्यालयात नोकरीसाठी मराठी उमेदवारांना डावलल्याचा प्रकार घडला होता. ही घटना ताजी असतानाच मराठी संस्कृतीचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱया विलेपार्लेत एका गुजराती बिल्डरने चक्क मराठी माणसाला घर नाकारल्याचा संतापजनक प्रकार घडला आहे. नॉनव्हेज खात असाल तर घर मिळणार नाही, असा फतवाच या बिल्डरने काढला.  याप्रकरणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने दिलेल्या दणक्यानंतर बिल्डर ताळय़ावर आला असून घर देताना यापुढे आम्ही भेदभाव करणार नाही, असे आश्वासन शिष्टमंडळाला देण्यात आले.

मिंधे सरकारच्या राज्यात मुंबईत मराठी माणसालाच डावलले जात असल्याच्या घटना वारंवार पाहायला मिळतात. मराठीबहुल विलेपार्ल्यात काही बिल्डर्स मराठी माणसांना घर देताना जाणीवपूर्वक किंमत वाढवून सांगतात. तसेच नॉनव्हेज खाणाऱयांना घर नाकारले जात आहे. असाच अनुभव जुईली शेंडे यांना आला. याप्रकरणी त्यांनी तत्काळ शिवसेना शाखेशी संपर्क केला.

 तर शिवसेना स्टाईल धडा शिकवू

महिलेच्या तक्रारीची दखल घेऊन शिवसेना नेते-आमदार अॅड अनिल परब यांच्या सूचनेनुसार शिवसैनिकांनी ऑर्किड बिल्डरचे अमित जैन यांच्या ऑफिसमध्ये घेराव घालून त्यांना निवेदन दिले. यापुढे मराठी माणसांना घर नाकारले किंवा नॉनव्हेज खाणाऱयांना घर नाकारले तर शिवसेना स्टाईलने धडा शिकवू, असा इशारा दिला. यावेळी विलेपार्ले विधानसभा संघटक संदीप नाईक, विधानसभा समन्वयक नितीन डिचोलकर, रूपाली शिंदे, शाखाप्रमुख प्रकाश सकपाळ, अनिल मालप, सिद्धेश पवार, पोपट बेदरकर, आनंद पाठक, नितेश गुरव, मुन्ना साबळे, हंसराज गुप्ता आदी उपस्थित होते.