पराभवाच्या भीतीने महायुतीचे दबावतंत्र; शिवसेना जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांना तडीपारीची नोटीस

महाविकास आघाडीचे नाशिक लोकसभा मतदारसंघातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांना सर्वत्र उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. त्यांचा विजय निश्चित असल्याने महायुतीचे धाबे दणाणले आहे. वाजे यांच्या प्रचारात अडथळा आणण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दबावाने शिवसेना जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांना तडीपार करण्याची नोटीस पोलिसांनी बजावली आहे. दरम्यान, ही बेकायदेशीर कारवाई त्वरित मागे घ्यावी, अशी मागणी महाविकास आघाडीने पोलीस आयुक्तांकडे केली आहे.

नाशिक लोकसभा मतदारसंघातील शिवसेना उमेदवार राजाभाऊ वाजे यांनी सुरुवातीपासूनच प्रचारात आघाडी घेतली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर विश्वास ठेवून सर्वत्र जनता उत्स्फूर्त प्रतिसाद देत आहे. वाजे यांचा विजय निश्चित मानला जात आहे. दुसरीकडे महायुतीचे मिंधे गटाचे उमेदवार खासदार हेमंत गोडसे हे अंतर्गत वाद आणि जनतेचा अल्पप्रतिसाद यामुळे पराभवाच्या छायेत आहेत. वाजे यांच्या प्रचारात अडथळा यावा, यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दबावाने सुधाकर बडगुजर यांना जिह्यातून तडीपार करण्याचा कट रचण्यात आला आहे. पोलिसांनी नोटीस बजावल्यानंतर बडगुजर हे गुरुवारी, 9 मे रोजी पोलीस आयुक्तालयात हजर झाले. ही कारवाईच बेकायदेशीर असून, 18 मेपर्यंत मुदत मागितली. त्यांची मागणी पोलीस अधिकाऱयांनी मान्य केली.

राजकीय सूडापोटी ही बेकायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. हद्दपारीच्या नोटिसीमध्ये 2010 ते 2014 या कालावधीतील राजकीय स्वरुपाच्या गुह्यांचा उल्लेख आहे. त्यात न्यायालयाने माझी निर्दोष मुक्तता केली आहे. मागील काही महिन्यांपूर्वी सलीम कुत्तासोबत डान्स केल्याप्रकरणी बेकायदेशीर गुन्हा दाखल झाला आहे, तो रद्द करण्यासाठी न्यायालयात दाद मागितली आहे, त्यात हद्दपारीची कारवाई होवू शकत नाही. एक वर्षाच्या काळात तीनपेक्षा अधिक गंभीर गुन्हे असल्यास ही कारवाई करता येते. त्यातही मी लोकसेवक आहे. लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून राजकीय सूडबुद्धीने माझ्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरल्यामुळे हे सर्व प्रकार सुरू आहेत, असे सुधाकर बडगुजर म्हणाले.