दहावीच्या परीक्षा शुल्कात 50 ते 100 रुपयांपर्यंत वाढ

17 नंबरचा अर्ज भरून खासगीरित्या दहावीच्या परीक्षेला बाहेरून बसणाऱया विद्यार्थ्यांना आता सर्वाधिक परीक्षा शुल्क भरावे लागणार आहे. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने 17 नंबरच्या अर्जात 30 रुपयांनी, तर नावनोंदणी शुल्कात 110 रुपयांनी वाढ केली आहे व नियमित विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क 420 रुपयांवरून 470 रुपये करण्यात आले आहे.

राज्य शिक्षण मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी जुलै-ऑगस्ट 2024 आणि मार्च 2025 मध्ये होणाऱया दहावीच्या परीक्षेसाठी सुधारित शुल्काचे दर जाहीर केले आहेत. सदर शुल्कवाढीबाबत सर्व शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना सूचित करण्यात यावे, अशा सूचना ओक यांनी सर्व विभागीय शिक्षण सचिवांना दिल्या आहेत. मंडळाने प्रशासकीय शुल्क, गुणपत्रिका, प्रमाणपत्र लॅमिनेशन, प्रात्यक्षिक परीक्षा शुल्क यात वाढ केली नसली तरी नियमित, खासगी, पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात तसेच श्रेणीसुधार योजनेचा लाभ घेणाऱया विद्यार्थ्यांच्या शुल्कात वाढ केली आहे.