आरटीई प्रवेश आता जुन्याच पद्धतीने; 15 जूनपर्यंत पहिली प्रवेश फेरी पूर्ण करण्याचा प्रयत्न

राज्य सरकारने आरटीई प्रवेशात केलेल्या बदलाला न्यायालयाने स्थगिती दिल्याने आता हे प्रवेश जुन्याच पद्धतीने होण्याची शक्यता आहे. इंग्रजी माध्यमाच्या स्वयंअर्थसहाय्यित शाळांचे पर्यायही प्रवेशासाठी विद्यार्थ्यांसमोर खुले असणार आहेत. मात्र यासाठी प्राथमिक शिक्षण संचालनालयाला राज्य सरकारच्या सूचनांची प्रतीक्षा असून शालेय शिक्षण विभागाकडून आरटीई प्रवेशाबाबत निर्देश मिळाल्यानंतर आरटीई प्रवेशाची बंद असलेली वेबसाईट कार्यरत होऊन पुढील प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे.

आरटीई शाळा प्रवेशाला न्यायालयाने स्थगिती दिल्यामुळे पालकांमध्ये संभ्रमाची परिस्थिती निर्माण झाली आहे. शालेय शिक्षण विभाग पुन्हा नव्याने प्रवेश प्रक्रिया राबविणार का? पालकांनी पुन्हा प्रवेश अर्ज करायचे का? शाळांची नोंदणी प्रक्रिया नव्याने होणार का? असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. या प्रश्नांवर प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी उत्तर दिले आहे. आरटीई प्रवेशासाठी शाळांची नोंदणी पूर्ण झाली असून अनेक इंग्रजी माध्यमाच्या शाळांची नोंदणीदेखील झाली आहे. त्यामुळे पुन्हा शाळा नोंदणीचा प्रश्न येत नाही, असे गोसावी यांनी सांगितले. पालकांना प्रवेश नोंदणीसाठी 10 मेपर्यंतची मुदत देण्यात आली होती. मात्र ही मुदत पूर्ण होण्याआधीच न्यायालयाने प्रवेश प्रक्रियेला स्थगिती दिली. त्यामुळे पालकांना प्रवेश अर्ज करण्यासाठी वाढीव मुदत मिळण्याची शक्यता आहे.

आरटीई प्रवेशाची वेबसाईट येत्या दोन ते तीन दिवसांत सुरू होईल. शाळांना नव्याने नोंदणी करण्याची गरज नाही. खासगी इंग्रजी शाळांनी याआधीच नोंदणी प्रक्रिया पूर्ण केली आहे. आता हे प्रवेश पुन्हा जुन्याच पद्धतीने पार पडतील. पालकांनी चिंता करू नये. प्रवेश प्रक्रियेसंबंधी वेळोवेळी माहिती दिली जाईल.

– शरद गोसावी, संचालक,  प्राथमिक शिक्षण.

15 जूनआधी पहिली प्रवेश फेरी पूर्ण करण्याचे लक्ष्य

मे महिना उजाडला तरी आरटीई शाळा प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली नाही. त्यामुळे 15 जूनला शाळा सुरू होण्याआधी तरी लॉटरी प्रक्रिया पार पडेल का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. आरटीई प्रवेशाच्या पहिल्या फेरीत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याचा प्रयत्न असतो. या फेरीनंतर प्रतीक्षा यादीवरील प्रवेश केले जातात. त्यामुळे 15 जूनपूर्वी पहिली प्रवेश फेरी पूर्ण करण्याचे प्राथमिक शिक्षण संचालनालयासमोर लक्ष्य आहे.