एव्हरेस्ट आणि एमडीएचच्या मसाल्यांबाबत आता अमेरिकाही सतर्क; मसाल्यांची तपासणी करण्याचा निर्णय

हाँगकाँग आणि सिंगापूरने हिंदुस्थानातील दोन लोकप्रिय मसाला ब्रँड एव्हरेस्ट आणि MDH च्या काही उत्पादनांवर बंदी घातली. तसेच त्याच्या विक्रीवरही बंदी घालण्यात आली. यामुळे हिंदुस्थानातील एव्हरेस्ट मसाला वापरणाऱ्या ग्राहकांना मोठा धक्का बसला. या मसाल्यात इथिलीन ऑक्साईड नावाचे कीटकनाशक आढळून आल्याने आता अमेरिकेतही या दोन ब्रँडची चौकशी सुरू झाली आहे. अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासनाने (FDA) देखील या मसाल्यांमध्ये कर्करोगास कारणीभूत असलेल्या कीटकनाशकाचा तपास सुरू केला आहे.

यूएस फूड सेफ्टी डिपार्टमेंट (USFDA) ने हाँगकाँग आणि सिंगापूरमध्ये मसाल्यांवर बंदी घातल्यानंतर MDH आणि एव्हरेस्टच्या उत्पादनांची माहिती गोळा करण्यास सुरुवात केली आहे. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, एफडीए या दोन ब्रँडच्या उत्पादनांवर बंदी घालण्याबाबत सतर्क आहे. त्यामुळे याबाबत आणखी काही माहिती मिळते का यासाठी प्रय़त्न केले जात आहेत. या समस्येबाबत बोर्डाने मसाला उद्योगाकडून सविस्तर माहितीही मागवली आहे. अन्न सुरक्षा आणि गुणवत्ता सुनिश्चित करणे ही त्यांची पहिली प्राथमिकता असल्याचे बोर्डाने म्हटले आहे. हिंदुस्थानसोबतच युरोप, आशिया आणि उत्तर अमेरिकेत एमडीएच आणि एव्हरेस्टच्या मसाल्यांना चांगली मागणी आहे. एमडीएच आणि एव्हरेस्टने याबाबत तात्काळ कोणतेही वक्तव्य दिलेले नाही.

हाँगकाँगने MDH च्या मद्रास करी पावडर, सांभर मसाला मिक्स पावडर आणि करी पावडर मिश्रित मसाला यावर बंदी घातली आहे. तर सिंगापूरने आपल्या नागरिकांना एव्हरेस्टची फिश करी मसाला पावडर वापरण्यापासून रोखले आहे. तो बाजारातून मागे घेण्याचे आदेशही कंपनीला देण्यात आले आहेत. कारण हाँगकाँग आणि सिंगापूरच्या अन्न सुरक्षा विभागाच्या म्हणण्यानुसार इथिलीन ऑक्साईड या रसायनाचा दीर्घकाळ वापर केल्याने कर्करोग होऊ शकतो.