Video : ते परत महाराष्ट्रात आले? शरद पवार यांचा मोदींना खोचक टोला

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सडकून टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांना दिलेल्या ऑफरबाबत पत्रकारांनी पंतप्रधानांना विचारले असता त्यांनी मोदी परत महाराष्ट्रात आले? असा खोचक सवाल करत मोदींना टोला लगावला. यावेळी पवार यांनी मोदी हे सहा ते सात वेळा महाराष्ट्रात आल्याचेही सांगितले. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी महायुतीत सामिल व्हावं असे खुले आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नंदुरबार येथील सभेत केले होते. त्यांच्या या ऑफऱचा शरद पवार यांनी खरपूस समाचार घेतला.

आज देशात संसदीय लोकशाही पद्धती ही मोदींमुळे संकटात आली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल किंवा झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना अटक करून तुरुंगात टाकण्यात आलं. केंद्रीय नेतृत्व आणि केंद्र सरकारचा सहभाग असल्याशिवाय हे होऊच शकत नाही. लोकशाही पद्धतीवर कुणाचा कितपत विश्वास आहे, हे यावरून स्पष्ट होतं. ज्या व्यक्तीचा, धोरणाचा, पक्षाच्या विचारधारेचा संसदीय लोकशाहीवर विश्वासच नाही, असा समज लोकांमध्ये पक्का झालेला असेल, त्यांच्यासोबत व्यक्तीगत सोडा, राजकीय स्तरावर मी कधीच जाणार नाही, असं म्हणत शरद पवार यांनी पंतप्रधान मोदी, भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर एकाचवेळी निशाणा साधला.