देशाला नीलेश लंकेंची गरज, त्यांना दिल्लीला पाठवा ! खासदार सुप्रिया सुळे यांचे आवाहन

supriya-sule
एक सुसंस्कृत, कष्ट करणारा, तुमच्या आमच्या बरोबर असणारा अतिशय प्रेमळ लोकप्रतिनिधी म्हणून आपण त्यांना विधीमंडळात पाठविले. आता त्यांना दिल्लीला पाठवायचे असून देशाला नीलेश लंके यांची गरज असल्याचे खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले.
महाविकास आघाडीचे उमेदवार नीलेश लंके यांच्या प्रचारार्थ शेवगांव तालुक्यातील भातकुडगांव येथे आयोजित करण्यात आलेल्या सभेमध्ये सुप्रिया सुळे बोलत होत्या. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील सभेच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी राजेंद्र वळवी, वसंतराव चव्हाण, राजेंद्र आघाव, प्रताप ढाकणे, सुभाष लांडे, योगिता राजळे, ॠषीकेश ढाकणे, दत्तात्रेय फुंदे, शिवशंकर राजळे, समिर काझी, अशोक रोडे, वजीर पठाण, बाळासाहेब धोंडे, रामभाऊ साळवे, रामदास गोल्हार, राजेंद्र दौंड, बंडू रासने, सुभाष केकाण यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
दरम्यान सभेत बोलताना सप्रिया सुळे म्हणाल्या, ‘मत मागताना आपण कुणासाठी मते मागतोय हा देखील प्रश्‍न असतो. मला अभिमान वाटतोय की नीलेश लंके यांच्यासाठी मते मागण्याची संधी मला मिळाली. ही संधी दिल्याबद्दल मी इंडिया आघाडीला धन्यवाद देते. या सगळया निवडणुकीत आम्ही जी मेहनत घेतोय, कदाचित त्यापेक्षा जास्त मेहनत काँग्रेस आणि शिवसेना घेतेय हे मी गेल्या महिनाभरापासून अनुभवते असे सुळे म्हणाल्या.नीलेश लंके यांचा विजय निश्चित आहे.त्यांनी दिल्लीची बॅग भरून तिकीट लगेच बुक करावे असे मला वाटतंय असा विश्‍वास सुळे यांनी व्यक्त केला.
 सुळे पुढे म्हणाल्या, अनेक आरोप, प्रत्यारोप झाले. आमच्याबद्दलही बोलतात. मी त्याची फार काळजी करत नाही. कारण आमचं मन साफ आहे. आम्ही कोणतीही गोष्ट कुणाचा अपमान करण्यासाठी करत नाही किंवा आणि आम्ही इतिहासातही रमत नाही.आरोप माझ्यावरही होतात. सन २००४,२०१८,२०२०मध्ये झाले. २००४ मध्ये झालेल्या गोष्टीला वीस वर्षे झाली. त्याचे उत्तर आज मिळाले तर कांद्याला भाव मिळणार आहे का, कापसाला भाव मिळणार आहे का ? देशातला भ्रष्टाचार कमी होणार आहे का ? महागाई कमी होणार आहे  असे प्रश्‍न सुळे यांनी उपस्थित केले.