रत्नागिरी शहरात पाणी कपात, शीळ धरणात 20 टक्केच साठा

रत्नागिरी शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या शीळ धरणातील पाणीसाठा कमी झाला आहे. शीळ धरणात सध्या 20 टक्केच पाणी साठा उपलब्ध आहे. जून महिन्यात मान्सून लांबल्यास शहरावर भीषण पाणी टंचाईचे संकट ओढवू शकते. यामुळे रत्नागिरी नगरपरिषदेने सोमवार दि. 13 मेपासून रत्नागिरी शहरात पाणी कपात सुरु केली आहे. 13 मे पासून शहरामध्ये एक दिवस आड पाणी पुरवठा होणार आहे.

गतवर्षी अल-निनोमुळे पर्जन्यमानावर विपरित परिणाम झाला. सरासरी पर्जन्यमानापेक्षा कमी पर्जन्यमान झाल्यामुळे शीळ धरणात कमी पाणी साठा झाला. त्याचबरोबर तीव्र उन्हाळ्यामुळे होणाऱ्या बाष्पीभवनाचा परिणामही पाणी साठ्यावर झाला आहे. सध्या शीळ धरणामध्ये 0.814 दशलक्ष घनमीटर इतका उपयुक्त पाणीसाठा आहे. म्हणजेच धरणात 20 टक्केच पाणीसाठा उपलब्ध आहे. यंदा मान्सूनचे आगमन विलंबाने झाल्यास शीळ धरणातील पाणी साठा संपण्याची भीती आहे. दुसरा कोणताही जलस्त्रोत उपलब्ध नसल्यामुळे रत्नागिरी शहरावर भीषण पाणी टंचाईचे संकट ओढवू शकते, त्यामुळे धरणातील पाण्याचा काटकसरीने आणि जबाबदारीने वापर करणे आवश्यक आहे. 13 मे पासून रत्नागिरी शहरामध्ये पाणी कपात होणार असून एक दिवस आड पाणी पुरवठा होणार आहे.

पाणी पुरवठ्यासाठी शहराचे दोन भाग

एक दिवस आड पाणी पुरवठा करण्यासाठी शहराचे दोन भाग करण्यात आले आहेत. 13 मे रोजी पहिल्या दिवशी सन्मित्रनगर, गवळीवाडा, आंबेशेत, लांबेचाळ, माळनाका, मारुतीमंदिर, एस.व्ही. रोड, हिंदूकॉलनी, आनंदनगर, विश्वनगर, नुतननगर, अभ्युदयनगर, उद्यमनगर, नरहर वसाहत, शिवाजीनगर, साळवीस्टॉप, रमेशनगर, छत्रपतीनगर, सहकारनगर, विष्णूनगर, नवलाईनगर, चार रस्ता मजगाव रोड, स्टेट बँक कॉलनी, म्युन्सिपल कॉलनी, एकता मार्ग, राजापूरकर कॉलनी, कोकणनगर जुने, किर्तीनगर, कोकणनगर फेज 4 या भागात पाणीपुरवठा होणार आहे. दि.14 मे रोजी राजीवडा, निवखोल, शिवखोल, गवळीवाडा, बेलबाग, चवंडेवठार, घुडेवठार, खडपेवठार, मांडवी, रामआळी, मारुतीआळी, गोखलेनाका, राधाकृष्णनाका, झारणीरोड, जेलरोड, धनजीनाका, आठवडाबाजार, झाडगाव, टिळकआळी, शेरेनाका, तेलीआळी, जोशी पाळंद, वरची आळी, खालची आळी, लघुउद्योग, मुरुगवाडा, पंधरा माड, मिरकरवाडा, राजवाडी, 80 फुटी हायवे परिसर, पेठकिल्ला, मांडवी, वरचा फगरवठार, पोलीस लाईन, तांबटआळी, भुवडआळी, आंबेडकरवाडी, राहूल कॉलनी, फातिमानगर, आझादनगर, कुंभारवाडा, थिबापॅलेस, आदमपुर या भागात पाणी पुरवठा होणार आहे.