हा तर हुकुमशाहीविरोधातील बदलाचा संकेत – आदित्य ठाकरे

दिल्ली मद्य घोटाळा प्रकरणात अटक करण्यात आलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिलेला आहे. केजरीवाल यांना 1 जून पर्यंत अंतरिम जामीन मंजूर करण्यात आलेला आहे. केजरीवाल यांना जामीन मंजूर झाल्याने आम आदमी पार्टीला निवडणूकीपूर्वी मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान न्यायालयाचा हा निर्णय म्हणजे देशातील हुकुमशाहीविरोधातील बदलाचे संकेत आहेत, अशी प्रतिक्रीया शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी दिली आहे.

”अरविंद केजरीवाल यांना मिळालेला न्याय व दिलासा हा देशातील हुकुमशाहविरोधात बदलाचे वारे वाहू लागल्याचा मोठा संकेत आहे. केजरीवाल हे सत्य बोलत आहेत व तेच भाजपला आवडत नाही. आम्ही आमच्या संविधानाचे व लोकशाहीचे संरक्षण करू, असे ट्विट आदित्य ठाकरे यांनी केले आहे.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी कथित मद्य घोटाळ्याप्रकरणी ईडीने केलेल्या अटकेला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. या याचिकेच्या सुनावणीदरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने म्हटले होते की ते केजरीवाल यांच्या अंतरिम जामिनावर विचार करू शकतात, ज्याला ईडीने गुरुवारी प्रतिज्ञापत्र दाखल करून विरोध केला होता. त्यावर आज निर्णय देण्यात आला आहे.