मोदींच्या इंजिनाला भ्रष्टाचाराची चाकं, आता जनता यांना थेट गुजरातलाच पाठवणार; उद्धव ठाकरे कडाडले

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे गुरुवारी छत्रपती संभाजीनगर येथे महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांच्या प्रचारार्थ आले होते. यावेळी भाषण करताना उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर घणाघात केला. ”देवेंद्र फडणवीस म्हणतात मोदीजींच्या इंजिनाला विकासाची चाकं आहेत. पण आहे कुठे विकास. गेली दहा वर्ष आम्ही बघतोय. तुमच्या डब्ब्यांना आता भ्रष्टाचाराची चाकं आहेत. संपूर्ण देशाने आता ठरवलं आहे की हे इंजिनच बदलायचं आहे आणि द्यायचंय गुजरातला पाठवून”, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली.

”महाराष्ट्राने मोदीजींना झुकवलं आहे. एवढी प्रचंड ताकद लावली आहे भाजपने. काही दिवसांपूर्वी मला लातूरमार्गे एका ठिकाणी जायचे होते. पंतप्रधान येत होते म्हणून लातूर एअरपोर्ट बंद ठेवले होते. पंतप्रधान पुण्यात येत होते तेव्हा पुण्याच्या रस्त्याना छावणीचं स्वरुप आलेलं. तुम्ही उडत असताना विमान बंदी असते. चालताना रस्त्यांना छावणीचं स्वरुप. हे बरोबर नाही. समान नागरी कायदा जो नंतर आणायचा तो नंतर बघू आपण. ज्या सोयी सुविधा ज्या आम्हाला देता त्या त्यांना दिल्या पाहिजे. मोदीजी तुम्ही एकदा पोलीस बाजूला ठेवून जनतेत येऊन दाखवा. रस्त्याने चालतानाही एकटे चालता. तरी देखील मोदीजी म्हणतात की आम्ही त्यांना संपवायला निघालो आहो. एवढे केविलवाणे का झाला आहात? सर्व ताकद तुमच्याकडे आहे. तुम्ही माझा पक्ष चोरला, माझी माणसं पळवली, तरी देखील तुम्हाला माझी भीती वाटते, असा टोला उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लगावला आहे. .

”आज एक रिपोर्ट जाहीर झाला आहे. देशात गेल्या काही वर्षात मुसलमानांची लोकसंख्या वाढली आहे. आता हे तुमच्या सरकारचं यश आहे की अपयश? यासाठी तुमचं कौतुक करायचे की विरोध करायचा? मोदीजी तुम्ही जी भाषा वापरताय ती तुम्हाला शोभा नाही देत. आमच्या हिंदु्स्थानाला व महाराष्ट्राला ही भाषा नाही चालणार. आम्ही खपवूनच घेऊ शतत नाही. हा महाराष्ट्र साधू संतांचा आहे. पंढरपूरच्या वारीतही फुगड्या खेळल्यावर आशिर्वाद घेण्याची पद्धत आहे. कधी मला डोळा मारताय, कधी शरद पवारांना डोळा मारताय. आम्हाला नकली शिवसेना, नकली राष्ट्रवादी म्हणायचं मग आम्हालाच आजा मेरी गाडी में बैठ जा म्हणायचं. मोदीजी आता एवढे घाबरलेयत की यांना समजलं आहे की हे आता पुन्हा दिल्ली बघणार नाही. त्यामुळे यांचे हे असे प्रकार सुरू आहेत, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.

”तुम्ही पंतप्रधान व्हावं या पत्रावर 2014 ला तुम्ही माझी सही घेतली होती. 2019ला देखील घेतली. काल जे बोललात त्याला मी व माझा महाराष्ट्र माफ नाही करू शकणार. मला बाळासाहेबांचा नकली संतान म्हणालात. मोदीजी, जसं सर्व अदानीला विकलं तसं तुम्ही तुमचा आत्मा सैतानाला विकला काय? कशाला ही थेरं करताय. बाळासाहेबांच्या आत्म्याला काय वाटत असेल? 2014 साली तुमच्या बुडाला पंतप्रधानपदाची खुर्ची चिकटवण्यासाठी शिवसेनेचा पाठिंबा घेतला होतात ना. 2014 लाच मला युती तुटल्याचा खडसेंनी कळवलं. काय वाटलं असेल त्यावेळी बाळासाहेबांच्या आत्म्याला. 2019 ला बाळासाहेबांच्या खोलीत बसून अमित शहा यांनी ठरवलं होतं अडीच अडीच वर्षाच्या मुख्यमंत्रीपदाचं. तो शब्द तुम्ही मोडलात. काय वाटलं असेल बाळासाहेबांच्या आत्म्याला. माझं ऑपरेशन झालं तेव्हा गद्दारी करून माझा पक्ष फोडला तेव्हा बाळासाहेबांच्या आत्म्याला काय वाटलं असेल. म्हणून तुम्ही हिंदुहृसम्राटांच्या आत्म्याची चिंता करू नका. त्यांचे आशिर्वाद नसते तर आज तुम्हाला जे महाराष्ट्राने रस्त्यावर गुडघे टेकायला लावले आहेत. ते लागले नसते. आता मुंबईत रोड शो घेणार आहेत. त्यामुळे आता हा माझा महाराष्ट्र तुम्हाला रस्त्यावर फिरवल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.

”मोदी म्हणतात राहुल गांधींनी अदानी- अंबानींविषयी बोलायचे का सोडले? त्यांनी म्हटले टेम्पो भरून किती काळे धन घेतले. मोदीजी त्यावेळी तुमचे ईडी सीबीआय काय करत होते. तुमच्याकडे माहिती होती तर धाडी का नाही टाकल्या. जर काळा पैसा टेम्पो भरून गेला असेल तर नोटबंदी फसल्याची तुम्ही कबूली दिली पाहिजे. तुमचं सगळंच फसलं आहे. देवेंद्र फडणवीस म्हणतात मोदीजींच्या इंजिनाला विकासाची चाकं आहेत. पण आहे कुठे विकास. गेली दहा वर्ष आम्ही बघतोय. तुमच्या डब्ब्यांना आता भ्रष्टाचाराची चाकं आहेत. संपूर्ण देशाने आता ठरवलं आहे की हे इंजिनच बदलायचं आहे आणि द्यायचंय गुजरातला पाठवून. तुम्ही मला ड्युप्लिकेट म्हणता, पवारांना भटकती आत्मा म्हणता. इथे आमच्या शेतकऱ्यांचे आत्मा तळमळतायत, पाण्यासाठी काहूर माजलं आहे. अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. मनमोहन सिंह पंतप्रधान होते. त्यावेळी मोदीजी बोललेले प्रधानमंत्री महागाईचा देखील म बोलत नाही. आता तुमच्या काळात तुम्ही गाईवर बोलता मग महागाईवर का नाही बोलत. हा महाराष्ट्र आता नाणेबंदी करतोय. मोदीजी चार जून नंतर तुम्ही पंतप्रधान नसाल. चार जूननंतर महाराष्ट्राची नाणेबंदी होईल, असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला.