अरविंद केजरीवाल यांच्या खासगी सचिवाना निवासस्थान सोडण्याचे आदेश

कथित मद्य घोटाळा प्रकरणात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे तिहार तुरुंगात आहेत. अरविंद केजरीवाल यांचे खासगी सचिव बिभव कुमार यांना पदावरून बडतर्फ केल्यानंतर आता दक्षता विभागाने आणखी एक कारवाई केली आहे. बिभव कुमार यांना सरकारी निवासस्थान तत्काळ रिकामे करण्याचे आदेश दिले आहेत. दिल्लीचे नायब राज्यपाल विनय कुमार सक्सेना यांनी बिभव कुमार यांची नियुक्ती बेकायदेशीर आणि अवैध ठरवली होती. नियमानुसार बिभव कुमार यांना 10 मेपर्यंत बंगला रिकामा करण्याचे आदेश दिले आहेत.

बिभव कुमार यांना पदावरून बडतर्फ केल्यानंतर त्यांच्या घराचे अलॉटमेण्ट रद्द केले आहे. सरकारी नियमानुसार त्यांना दिलेल्या तारखेनुसार निवासस्थान रिकामे करायला सांगितले आहे. याआधी दक्षता विभागाच्या पथकाने बिभव कुमार यांच्याविरोधात कडक कारवाई करत त्यांना पदावरून बडतर्फ केले होते. बिभव कुमार यांच्या नियुक्तीत नियमांचे योग्य पद्धतीने पालन केले गेले नव्हते. त्यांना 10 एप्रिल रोजीच सेवेतून बडतर्फ करण्यात आले होते. तपास प्रक्रियेत बिभव कुमार यांची नियुक्ती बेकायदेशीर ठरवली होती. दिल्ली कथित मद्य धोरण घोटाळ्यातील मनी लॉण्ड्रींग प्रकरणात बिभव कुमार यांचे नावही आहे. ईडीने याप्रकरणी त्यांची 8 एप्रिलला चौकशी केली होती. बिभव कुमार यांच्या घरावर छापेही मारले गेले आहेत, असे दक्षता विभागाने सांगितले होते.

ईडीच्या टीमने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना यापूर्वीच अटक करून तुरुंगात टाकले आहे. अरविंद केजरीवाल यांना 21 मार्च रोजीच अटक करण्यात आली होती. केजरीवाल सध्या तिहार तुरुंगात आहेत. या प्रकरणी मनीष सिसोदिया आणि संजय सिंह यांनाही अटक करण्यात आली होती. मात्र, संजय सिंग सध्या जामिनावर बाहेर आहे. तर अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदिया यांना अद्याप न्यायालयाकडून दिलासा मिळालेला नाही.