गुजरातमध्ये भाजप आमदाराने दिला राजीनामा

गुजरातमध्ये भाजपा आमदार केतन इनामदार यांनी आज विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी राजीनामा दिल्यामुळे भाजपासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. मात्र हे दबावतंत्र नसून मी आतला आवाज ऐकून आमदारकीचा राजीनामा दिल्याचे इनामदार यांनी म्हटले आहे. तसेच लोकसभा निवडणुकीसाठी वडोदऱ्यातून रिंगणात असलेले भाजपा उमेदवार रंजन भट्ट यांच्या विजयासाठी प्रचार करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. असे असले तरीही इनामदार यांनी पत्रकारांसमोर मनातले मांडले.

पक्षात छोटय़ा आणि जुन्या कार्यकर्त्यांची दखल घेतली जात नसल्याचे मला दिसून आले. मी पक्षनेतृत्वाच्या हे नजरेस आणून दिले, असेही इनामदार म्हणाले. सावली मतदारसंघाचे मी 11 वर्षांहून अधिक काळ प्रतिनिधित्व केले. मी सर्वात सक्रीय लोकप्रतिनिधी होतो. परंतु 2020मध्येही मी म्हणालो होतो. स्वाभिमानापेक्षा काहीही मोठे नाही आणि हा एकटय़ा केतन इनामदारचा आवाज नाही तर पक्षातील प्रत्येक कार्यकर्त्याचा आवाज आहे. पक्षातील जुन्या कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष करू नका, असे यापूर्वीच सांगितले होते, असेही इनामदार म्हणाले.