अभिप्राय – वर्तमानकाळाचं सजग स्कॅनिंग

 

>> डॉ. महेश केळुसकर

’निमित्तमात्र’ या कवितासंग्रहानंतर तब्बल नऊ वर्षे थांबल्यानंतर गीतेश गजानन शिंदे यांनी ‘सीसीटीव्हींच्या गर्द छायेत’ या आपल्या दुसऱया संग्रहातून आपली कवितेतली परिपक्वता वाचकांसमोर ठेवली आहे. आभासी जगाची चटक लागलेल्या जगाची वेबसाईट शोधण्याचा त्यांचा प्रयत्न निश्चितच लक्षणीय आहे. तरुण कवींच्या नव्या पिढीतील गीतेश शिंदे हे एक लक्षणीय सशक्त कवी आहेत. पूर्वसुरींच्या कवितेतील स्वत्व आणि सत्त्व घेऊन आधुनिकोत्तर काळाच्या शैलीत आपली काव्यात्म अभिव्यक्ती ते करतात आणि म्हणूनच समकालीन कवितेत त्यांची कविता आपले वेगळेपण अधोरेखित करते.

भूत, वर्तमान, भविष्य काळाबद्दल संवेदनशील असणारे हे कविमन अस्वस्थ आहे. आभासी गुलछबू स्वप्नांमध्ये मश्गुल राहायला ते नकार देते आणि व्यवस्थेच्या तोंडावर कवितेची चप्पल भिरकावून देते. मोबाईल पीनवर सराईत अंगठे आणि आकाशात भणंग मुसाफिरांसारखे नुसतेच ढग फिरत राहण्याचा हा काळ नव्या कालसुसंगत प्रतिमांमधून कवी पकडू पाहतो. गळ्यात दाटणाऱया चिवचिव हुंदक्यांची काळजी करणारी कोवळीक या कविहृदयापाशी असल्याने माणूसपणाच्या अस्तित्वासाठी तो झगडत राहतो.

संवादांच्या आदिम गुहेतील भित्तिचित्रांमध्ये

अक्षरांच्या गंजलेल्या खिळ्यांनी

भाषा होतेय रक्त बंबाळ…

अशी संवादभाषेची काळजीही करणारा हा कवी वर्तमानकाळाचं सजग स्कॅनिंग करण्यासाठी आपल्या कवितेत नवी भाषा आणतो. माणूसही – धुळीचा ठिपकाच / शक्यतांच्या पलीकडल्या फटींमधला असे चिंतनात्मक विधान करतो. आईसोबतच बोलीभाषेची चिता जळताना पाहत असताना मातृभाषेच्या जगण्या-मरण्याची चिंता करतो. ‘कुतूहल’सारखी सच्ची प्रेमकविता ‘नवरा वारल्यावर’सारखी सूक्ष्म संवेदन कविता, ‘शाप’, ‘पाळणा’, ‘घड्याळ’ यासारख्या कवितांमधले बाप-लेकाचे नातेसंबंध या कवितासंग्रहाची गुणवत्ता वाढवतात.

‘सीसीटीव्हींच्या गर्द छायेत’मधील कवितांची निवड आणि मांडणी अतिशय सजगतेने केलेली आहे. काही कवितांमधील संवाद आणि नाट्यमयता आशयाचा परिणाम वाढवतात. गीतेश शिंदे यांच्या ‘संचित’, ‘नको देऊ तडा’, ‘लोकलची वारी’ या नव्या अभंग रचना तर वारकरी परंपरेशी असलेले त्यांचे नातेगोते घट्ट करतात. अन्वर हुसैन यांचे संवेदनशील मुखपृष्ठ हाही या संग्रहाचा एक विशेष आहे.

सीसीटीव्हींच्या गर्द छायेत  लेखक : गीतेश गजानन शिंदे 

प्रकाशन : शब्दालय प्रकाशन  पृष्ठे : 128   मूल्य : 250/-