सृजन संवाद – क्रौंचवध

>>डॉ. समिरा गुजर जोशी

मागील लेखात उल्लेख केल्याप्रमाणे ऋषी वाल्मीकींनी नारदाकडे सध्याच्या काळात गुणवंत पुरुष कोण? असे विचारल्यावर नारदमुनींनी त्यांना प्रभू श्रीरामांचे चरित्र सांगितले. म्हणजे गमतीची गोष्ट ही की, रामायणाचे कथानक आपल्याला पहिल्याच सर्गात कळते. आज जो कथाभाग आपण पाहणार आहोत ती वाल्मीकींचा कवी म्हणून जन्म झाला त्याची कथा आहे. वाल्या कोळ्याचे परिवर्तन ऋषी वाल्मीकींमध्ये झाले ही जी प्रसिद्ध कथा आहे, ती मूळ ‘वाल्मीकी रामायणा’त येत नाही, तर ही वर सांगितलेली कथा येते. नारदमुनी आणि ऋषी वाल्मीकी यांची भेट झाल्यानंतर नारदमुनी प्रस्थान करतात. वाल्मीकी आपल्या शिष्यगणांसह तमसा नदीच्या तीरावर पोहोचतात. त्या पात्राचे ते सुंदर वर्णन करतात…रमणीयं प्रसन्नाम्बु सन्मनुष्य मनो यथा. हे पाणी सज्जनांच्या मनासारखे नितळ आहे, असे ते सांगतात.

अशा नितळ मनातच आजूबाजूच्या परिस्थितीचे चित्र उमटण्याची ताकद असते. यानंतर घडणाऱया क्रौंचवधाच्या प्रसंगाची ही जणू प्रस्तावना आहे. तमसा तीराभोवतीचा सुंदर निसर्ग न्याहाळताना त्यांची नजर एका क्रौंच पक्ष्याच्या जोडप्याकडे जाते. मधुर शब्द करणारी ती पक्ष्यांची जोडी त्यांना फार भावते. क्रौंच पक्षी म्हणजे सारस पक्षी. आजही उत्तर प्रदेशात अनेक ठिकाणी ते पाहायला मिळतात. आयुष्यभर ते एकाच जोडीदाराबरोबर राहतात अशी मान्यता आहे. अशा त्या प्रेमात रमलेल्या जोडप्याकडे वाल्मीकी स्निग्ध नजरेने पाहत असताना कोठूनसा अचानक एक बाण येतो. त्या जोडप्यातील नर पक्षी बाण लागून खाली कोसळतो. आपल्या जोडीदाराचा असा अचानक अंत झालेला पाहून मादी आक्रंदन करू लागते. या प्रसंगाने हेलावलेल्या वाल्मीकी ऋषींच्या तोंडून शापवाणी बाहेर पडते…“मा निषाद प्रतिष्ठां त्वमगम शाश्वतीः समाः यक्रौचमिथुनादेकमवधीः काममोहितम्.’’ अचानक त्या बेसावध पक्ष्यांवर घाला घालणाऱया पारध्याला त्यांनी शाप दिला की, “हे व्याधा, तुला कधीही गौरव प्राप्त होणार नाही. कारण रतिक्रीडेत रमलेल्या जोडप्यातील एकाला तू ठार मारलेस.’’ सहसा आपण आपल्या व्यथेने व्याकुळ होतो, पण वाल्मीकी दुसऱयाच्या दुःखाने व्याकूळ झाले आणि त्यांच्या ठायी कवितेचा जन्म झाला. कवितेचा जन्म करुणेतून होणे हा किती अद्भुत योग आहे. कविवर्य बा. भ. बोरकरांची एक अप्रतिम कविता आहे. त्यामध्ये या प्रसंगाविषयी सुंदर ओळी येतात.

स्वर्ग नको सुरलोक नको, मज लोभस हा इहलोक हवा
तृप्ती नको मज मुक्ती नको, पण येथील हर्षनी शोक हवा
शोक हवा परि वाल्मीकीच्या परि सद्रव अन सश्लोक हवा
हर्ष हवा परि स्पर्शमण्यापरि त्यांत नवा आलोक हवा
आयुष्यात शोक श्लोकत्व घेऊन यावा…

किती मोठे मागणे आहे. बोरकरांची ही कविता वाचताना आपण थरारून जातो. ही शापवाणी तोंडून निघून गेल्यावर वाल्मीकी भानावर येतात. आपण हे काय बोलून बसलो? असे त्यांना क्षणभर वाटून जाते, पण तोच त्यांच्या लक्षात येते की, आपण उच्चारलेली वाणी काही वेगळी होती. ही पादबद्ध, लयबद्ध रचना होती. ते आपल्या शिष्यांना म्हणतात, शोकार्तस्य प्रवृत्तो मे श्लोको भवतु नान्यथा. मी शोकाने आर्त असताना स्फुरलेली ही रचना श्लोकच म्हटली गेली पाहिजे (‘वाल्मीकी रामायण’ जनमानसात आणि आपल्या काव्यात कसे जपले गेले आहे याचे हे उदाहरण ठरावे. बोरकरांनी शब्दही तेच वापरले आहेत). अशा प्रकारे या लौकिक जगात काव्याचा जन्म झाला. कारण याआधी छंदोबद्ध रचना होती, पण ती वेदाच्या रूपात. वेद अपौरुषेय असल्यामुळे त्यांचा कुणी मानवी कर्ता नव्हता. ते दैवी काव्य ऋषींना दिसले असे मानले जाते. मानवाला स्फुरलेली ही पहिली छंदोबद्ध कविता म्हणून वाल्मीकी आदिकवी ठरले.

पुढे वाल्मीकी सचिंत परिस्थितीत आपल्या आश्रमात परततात. त्यांच्या मनात अजूनही त्या क्रौंच पक्ष्यांचा विचार सुरू आहे, हे सुचलेले शब्द मनात घोळत आहेत. अशा वेळी तेथे साक्षात ब्रह्मदेव प्रकट होतात आणि वाल्मीकींना या घटनेचा अर्थ सांगतात. ते म्हणतात, आज उच्चारलेली छंदोबद्ध शापवाणी तुम्ही आपसूक बोलला नाहीत. मी स्वत देवी सरस्वतीला तशी प्रेरणा दिली. कारण नारदमुनींनी तुम्हाला सांगितलेली रामकथा तुम्ही काव्यरूपात सांगावी हे त्यामागचे प्रयोजन आहे. ते कार्य तुमच्याकरवी घडावयाचे आहे! हिंदुस्थानी काव्यात करुण रसाला एक आगळे स्थान आहे याचे कारण या काव्याच्या जन्मकथेत दडले असावे. तसेही पाश्चात्त्य साहित्य शास्त्रही मान्य करते की, कारुण्याचा आविष्कार सहजसुंदर असतो. महाकवी शेले म्हणतो त्याप्रमाणे, `our sweetest songs are those that tell of saddest thought’ किंवा कवी शैलेंद्र लिहितो त्याप्रमाणे – ‘है सबसे मधुर वो गीत जिन्हे हम दर्द के सुर मे गाते है।’ पण या सिद्धांताचे कथारूप बहुधा फक्त हिंदुस्थानी परंपरेतच गवसते आणि पुन्हा एकदा तिची थोरवी लक्षात येते.

[email protected] (लेखिका निवेदिका, अभिनेत्री, संस्कृत – मराठी वाङमयाची अभ्यासक आहेत.)