डुबई! दोन वर्षांचा पाऊस 24 तासांत!!

संयुक्त अरब अमिरातीला मंगळवारी मुसळधार पावसाने झोडपलेदुबईत  दोन वर्षांचा पाऊस अवघ्या 24 तासांत पडला. त्यामुळे तेथील जनजीवन विस्कळीत झाले. रस्ते, घरे पाण्याखाली गेली. दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील धावपट्टी पाण्याखाली गेल्याने विमान सेवा ठप्प झाली. दुबई शेजारच्या ओमानमध्ये अतिवृष्टीमुळे आलेल्या पुरामुळे 18 लोकांचा मृत्यू झाला.

दुबईत मंगळवारी 12 तासांत 100 मिमी पावसाची नोंद झाली, तर 24 तासांत 160 मिमी पाऊस झाला. दुबई शहरात एका वर्षात सरासरी 88.9 मिमी पाऊस होतो. म्हणजे जवळपास दोन वर्षांचा पाऊस एका दिवसात पडला. त्यामुळे तिथली यंत्रणा ठप्प झाली. महामार्गांवर पाणी साठल्याने नागरिकांना त्यांची वाहने रस्त्यावरच सोडून द्यावी लागली. वादळी वाऱयांमुळे विमानतळावरही  अनेक विमाने जागीच थांबली. दुबईतील शाळांनाही सुट्टी दिली. सरकारी कर्मचारीही घरीच राहिले. रस्त्यावरील पाणी काढण्यासाठी प्रशासनाने टँकर पाठवले. घरांमध्येही पाणी घुसले.

वातावरण बदलाचा परिणाम

कोरडे वातावरण असलेल्या संयुक्त अरब अमिरातीमध्ये पाऊस फारसा पडत नाही. मात्र हिवाळय़ात थंड हवामानाच्या कालावधीत अधूनमधून पावसाच्या सरी पडतात. पावसामुळे पूरस्थिती उद्भवत नसल्याने अनेक रस्ते आणि अनेक भागांमध्ये सांडपाणी वाहून नेण्याची पुरेशी व्यवस्था नाही. वातावरण बदलाचा हा परिणाम असल्याचे बोलले जात आहे.

पुरामुळे 69 जणांचा मृत्यू

पूरसदृश परिस्थितीमुळे पाकिस्तानसह ओमान आणि यूएईमध्ये आतापर्यंत 69 जणांचा मृत्यू झाला. पाकिस्तानच्या सर्व प्रांतात मुसळधार पाऊस पडत असून खराब हवामानाचा सर्वात वाईट परिणाम खैबर पख्तुनख्वा आणि बलुचिस्तानमध्ये झाला आहे. तेथे आतापर्यंत 50 जणांचा मृत्यू झाला असून 32 जण गंभीर जखमी आहेत. खैबरमध्ये अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी साचल्याने वाहने अडकून पडली आहेत. पाकिस्तानच्या हवामान खात्याने 22 एप्रिलपर्यंत संपूर्ण देशात मुसळधार पाऊस आणि गारपिटीचा इशारा दिला आहे. दुसरीकडे दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर मंगळवारी 45 उड्डाणे रद्द करण्यात आली. 3 उड्डाणे इतर विमानतळांवर वळवली.