इलेक्टोरल बॉण्ड जगातील सर्वात मोठा घोटाळा; अथमंत्र्यांचे पती परकला प्रभाकर यांचा आरोप

सर्वोच्च न्यायालयाने दणका दिल्यानंतर स्टेट बँक वठणीवर आली. त्यानंतर जी माहिती बँकेने दिली त्यावरून अनेक धक्कादायक खुलासे समोर आले. ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांनी बोगस कंपन्यांचा मुद्दा मांडला, तर आता देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे पती आणि अर्थतज्ञ परकला प्रभाकर यांनी इलेक्टोरल बॉण्ड हा देशातील नव्हे तर जगातील सर्वात मोठा घोटाळा असल्याचा खळबळजनक आरोप केला आहे. तसेच भविष्यात याच मुद्दय़ावरून भाजप आणि हिंदुस्थानी नागरिकांमध्ये मोठा संघर्ष उभा राहील, असा दावाही केला आहे.

भविष्यात भाजप आणि विरोधी पक्षांमध्ये नाही तर खरा संघर्ष किंवा खरी लढाई भाजप आणि हिंदुस्थानच्या नागरिकांमध्ये होईल, असेही परकला प्रभाकर म्हणाले. इलेक्टोरल बॉण्डच्याच मुद्दय़ावरून हिंदुस्थानातील जनता लोकसभा निवडणुकीत भाजपला धडा शिकवेल, याचे परिणाम मोदी सरकारला भोगावे लागतील, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. काही दिवसांपासून याच मुद्दय़ावर सर्वसामान्य जनता चर्चा करताना दिसत आहे. हळूहळू जनतेलाही इलेक्टोरल बॉण्ड हा जगातील सर्वात मोठा घोटाळा असल्याचे कळून चुकेल आणि याच मुद्दय़ावरून भाजपला मतदारांच्या रोषाचा सामना करावा लागेल, असा दावाही परकला प्रभाकर यांनी केला.