केजरीवालानंतर ‘आप’चे मंत्री कैलाश गहलोत ईडीच्या निशाण्यावर, समन्स धाडून चौकशीला बोलावले

दिल्लीतील सत्ताधारी पक्ष आम आदमी पार्टीमाधील शुक्लकाष्ट संपण्याचे नाव नाही. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, मनिष सिसोदिया, संजय सिंह यांच्यानंतर आता इतर मंत्र्यांच्याही मागे केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमिरा लागला आहे. दिल्लीतील कथित मद्य घोटाळ्याप्रकरणी आप नेते आणि मंत्री कैलाश गहलोत यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) समन्स पाठवले असून आजच चौकशीसाठी बोलावले आहे. ‘एएनआय’ने याबाबत वृत्त दिले आहे.

कैलाश गहलोत यांच्याकडे परिवहन मंत्रालयाचा कारभार आहे. केजरीवाल यांच्या अटकेनंतर त्यांनी ‘इंडिया विद केजरीवाल’ अशा टॅगलाईनसह एक पोस्टर शेअर केले होते. संपूर्ण देश दिल्लीच्या सुपुत्रासोबत उभा आहे. कश्मीरपासून ते कन्याकुमारीपर्यंत केजरीवालांच्या समर्थनार्थ आवाज उठवला जात आहे. देशाचे राजकारण बदलणाऱ्या कट्टर देशभक्ताला देश एकटा सोडणार नाही, असे कॅप्शनही त्यांनी दिले होते. त्यानंतर काही दिवसातच त्यांना ईडीने समन्स पाठवले आणि चौकशीला बोलावले.

कैलाश गहलोत हे मद्य धोरणाचा मसुदा तयार करणाऱ्या सदस्यांपैकी एक होते आणि हा मसुदा त्यांनी दक्षिणेकडील व्यापारी गटासोबत शेअर केला होता. यासह दक्षिणेतील मद्य व्यावसायिक विजय नायर यांना त्यांनी आपले अधिकृत निवासस्थान दिल्याचाही आरोप गहलोत यांच्यावर आहे. या काळामध्ये गहलोत हे वारंवार आपला मोबाईल क्रमांक बदलत होते असा आरोपही ईडीने केला आहे.

आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कथित मद्य घोटाळ्याप्रकरणी ईडीने 21 मार्च रोजी अटक केली होती. त्यानंतर न्यायालयाने 1 एप्रिल पर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे. याच प्रकरणात ईडीने आधी मनिष सिसोदिया आणि संजय सिंह यांनाही अटक केली होती. ते सध्या तिहार तुरुंगात आहेत.