केजरीवाल यांच्या अटकेविरोधात उद्या ‘इंडिया’ची महारॅली

दिल्लीतील कथित मद्य धोरण घोटाळ्याच्या आरोपाखाली दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यात आली. केजरीवाल यांना प्रचारापासून रोखण्यासाठी मोदी सरकारने ईडीच्या आडून शिखंडी डाव टाकला. मोदी सरकारच्या या दडपशाही आणि हुकूमशाहीविरोधात उद्या इंडिया आघाडीने दिल्लीतील रामलीला मैदानात सकाळी 10 वाजता महारॅली आयोजित केली आहे. यावेळी इंडिया आघाडीच्या देशभरातील नेत्यांची भक्कम एकजूट दिसणार आहे. दारोदारी जाऊन दिल्लीकरांना रामलीला मैदानात एकवटण्यासाठी आवाहन करण्यात येणार आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गोपाल राय यांनी आज दिल्लीत वार्ताहरांना याबाबतची माहिती दिली.

इंडिया आघाडीच्या या महारॅलीत राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेस नेते राहुल गांधी, सपाचे अध्यक्ष अखिलेश यादव, राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांच्यासह इंडिया आघाडीतील विविध घटक पक्षांचे नेते सहभागी होणार आहेत. रामलीला मैदानात घेण्यात येणाऱया महारॅलीसाठी पोलिसांची परवानगी मिळाल्याचे गोपाल राय यांनी सांगितले. या महारॅलीसाठी 20 हजारांहून अधिक नागरिक उपस्थित राहतील असा विश्वासही राय यांनी व्यक्त केला. महारॅलीत अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनिता केजरीवाल सभेला संबोधित करणार की नाही याचा निर्णय त्यावेळीच घेण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

हे नेतेही सहभागी होणार

डेरेक ओब्रायन, त्रिची सीवा, फारुख अब्दुल्ला, झारखंडचे मुख्यमंत्री चंपाई सोरेन हे इंडिया आघाडीतील इतर घटक पक्षांतील प्रमुख नेतेही महारॅलीत सहभागी होणार आहेत. सध्या तुरुंगात असलेले झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या पत्नी कल्पना सोरेन यादेखील महारॅलीत असतील, अशी महिती गोपाल राय यांनी दिली.

दिल्लीत कडक सुरक्षा व्यवस्था

दिल्लीतील रामलीला मैदानात इंडिया आघाडीची महारॅली होणार आहे. या महारॅलीत हजारोंच्या संख्येने नागरिक, इंडिया आघाडीतील पक्षांचे कार्यकर्ते उपस्थित राहू शकतात. या पार्श्वभूमीवर आजपासूनच कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी भाजपाचे दिल्लीतील मुख्यालय, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे निवासस्थान आणि या मुख्यालयाकडे जाणाऱया रस्त्यांवर ठिकठिकाणी बॅरीकेड्स लावण्यात आले आहेत. मोठय़ा संख्येने पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. याशिवाय मध्य दिल्लीतही विविध ठिकाणी निमलष्करी दल तैनात करण्यात आले आहे.