दिल्लीत 31 मार्चला INDIA आघाडीचे शक्तिप्रदर्शन; शरद पवार, उद्धव ठाकरेंसह राहुल गांधींची तोफ धडाडणार

Lok Sabha Election 2024 :

लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर सर्वच राजकीय पक्ष सक्रिय झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर 31 मार्च रोजी ‘इंडिया’ आघाडीची महासभा होणार आहे. या महासभेला ‘इंडिया’ आघाडीतील दिग्गज नेते उपस्थित असणार आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक, काँग्रेसला आलेली 1800 कोटी रुपयांची आयकर विभागाची नोटीस आणि इलेक्टोरल बॉण्डचे प्रकरण या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर ही महासभा होणार आहे. झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या पत्नी कल्पना सोरेनही या सभेला संबोधित करणार आहेत. दिल्ली पोलिसांनी या सभेला परवानगी दिली आहे.

मोदी सरकारच्या या दडपशाही विरोधात या महासभेचे आयोजन करण्यात आले आहे. ही सभा दिल्लीतील रामलीला मैदानात सकाळी 10 वाजता आयोजित केली आहे. या सभेत मल्लिकार्जुन खर्गे, राहुल गांधी (काँग्रेस), राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, शिवसेना नेते आदित्य ठाकरे, अखिलेश यादव (एसपी), तेजस्वी यादव (आरजेडी), डेरेक ओब्रायन (टीएमसी), टी. शिवा (डीएमके), फारुख अब्दुल्ला (राष्ट्रीय काँग्रेस), चंपाई सोरेन, कल्पना सोरेन (जेएमएम), सीताराम येचुरी (सीपीएम), डी. राजा (सीपीआय), दीपंकर भट्टाचार्य (सीपीआय-एमएल) आणि जी देवराजन हे देखील सहभागी होणार आहेत.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी दिल्लीत काँग्रेस आणि आम आदमी पार्टीची संयुक्त पत्रकार परिषद झाली होती. केजरीवाल यांच्या अटकेमुळे संविधान आणि लोकशाहीवर प्रेम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या मनात मोदी सरकारच्या हुकूमशाही आणि दडपशाहीविरोधात संतापाची लाट उसळली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करत आहेत. एकीकडे आमदार खरेदी केले जात असून दुसरीकडे तपास यंत्रणांचा धाक दाखवून त्यांचा भाजपप्रवेश घडवून आणला जात आहे. आमदारांविरोधात खोटे खटले दाखल करून त्यांना अटक केली जात आहे. संपूर्ण विरोधी पक्षाला एक एक करून संपवण्याचे षडयंत्र देशात रचले जात असल्याचा आरोप विरोधी पक्षाच्या नेत्यांनी केला. झारखंडच्या मुख्यमंत्र्यांना अटक ते पश्चिम बंगालपासून बिहारपर्यंत ‘इंडिया’ आघाडीच्या नेत्यांवर खोटे गुन्हे दाखल करून त्यांना गप्प करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोपही विरोधी पक्षांनी केला.