अवकाळी पावसाने जळकोट तालुक्यास झोडपले, आंबा व रब्बी पिकांना फटका

निसर्गाच्या लहरीपणाचा फटका झेलण्यासाठी जळकोट तालुक्यातील शेतकर्‍यांना नेहमीच तयार असावे लागते. कधी पावसाची अवकृपा तर कधी अतिवृष्टी, अवकाळी पाऊस ही समस्या या तालुक्यातील शेतकर्‍यांसाठी नवी नाही. शनिवारी सायंकाळी अवकाळी पावसाने जळकोट तालुक्यास झोडपून काढले आणि पुन्हा एकदा शेतकर्‍यांची दाणादाण उडाली. अतिवृष्टीच्या नुकसानीचे मागील अनुदान व पीक विमा मिळालेला नसतानाच पुन्हा एकदा नुकसानीच्या संकटाने शेतकर्‍यांच्या दारात हजेरी लावली आहे.

राज्यकर्त्यांची कोरडी आश्वासने, पीक विमा कंपन्यांची चलाखी आणि कागदी घोडे नाचविण्यात दंग असलेला प्रशासनाचा वेळकाढूपणा हे शेतकर्‍यांसाठी नित्याचेच झाले आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे मागच्या नुकसानीची मदत पदरात पडलेली नसतानाच दुसरे नवे संकट दारात उभे राहिले आहे. त्यामुळे जळकोट तालुक्यातील शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. शनिवारी तालुक्यात अचानक अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे कडक उन्हापासून एकीकडे तात्पुरता दिलासा मिळाला असतानाच आंबा फळ पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. आंब्याच्या बागांची नासाडी होऊन आंब्याच्या फळांचा जमिनीवर सडा पडला आहे. वांजरवाडा (ता.जळकोट) येथील शेतकरी माधव जाधव यांच्या शेतातील केसर आंब्याचे अतोनात नुकसान झाले आहे. मागील वर्षी काही काळ पावसाची अवकृपा आणि काही काळ अतिवृष्टी यामुळे शेतीने दगा दिला. केसर आंबा आपल्याला उभारी देईल, असे स्वप्न माधव जाधव यांच्याप्रमाणेच तालुक्यातील अनेक शेतकर्‍यांनीं पाहिले होते. मात्र ते स्वप्न अवकाळी पावसाने एका फटक्यात चक्काचूर केले आहे.

चिंच फळ, तसेच गहू, हरभरा आदी पिकांचेही अवकाळी पावसाने नुकसान केले आहे. नैसर्गिक आपत्तीनंतर शेतकर्‍यांना तातडीने नुुकसान भरपाई देण्याचे शासन निर्णय असले तरी शासन व्यवस्था व प्रशासन गंभीर नसल्याने आपदग्रस्त शेतकर्‍यांना महिनोंमहिने मदत मिळत नाही. त्यामुळे शेतकर्‍यांचा केवळ शासकीय कार्यालयांचे हेलपाटे मारण्यातच वेळ निघून जात आहे. मागील वर्षीचा पीक विमा देण्यास टाळाटाळ सुरू आहे. त्यामुळे शेतकरी वैतागले असून, अवकाळीच्या संकटाने शेतकर्‍यांच्या पायाखालची जमीनही सरकू लागली आहे.

तालुक्यातील शेतकर्‍यांचे अवकाळीमुळे किती नुकसान झाले आहे याबद्दल तालुका कृषी अधिकारी आकाश पवार यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी तलाठी व कृषी सहाय्यक यांच्या मार्फत सोमवारी माहिती संकलित होईल, अशी माहिती दिली. प्रशासन पंचनामे करील आणि कागदी घोडे नाचविण्यात वेळ घालवेपर्यंत आणखी एक नवे संकट येईल, असे तालुक्यातील जाणकार बोलून दाखवत आहेत. आजही ढगाळ वातावरण कायम असून, पावसाची शक्यता आहे. त्यामुळे आणखी किती दिवस अवकाळीची समस्या सतावेल, अशी भीती तालुक्यातील शेतकर्‍यांना सतावत आहे.