कोविडमध्ये राहुल नार्वेकर अलिबागच्या बंगल्यात लपून होते, आदित्य ठाकरे यांचा हल्लाबोल

शिवसेना कोविड काळात नागरिकांच्या मदतीसाठी रात्रंदिवस काम करत होती. मुंबईने संपूर्ण देशच नव्हे तर जगाला आदर्श दिला. जगाने गौरवलेला कोविडमुक्ती पॅटर्न राबवणारे तत्कालीन मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनात शिवसैनिक रस्त्यावर उतरून काम करत होते. त्यावेळी कुलाब्यातील आमदार राहुल नार्वेकर मात्र कुटुंबीयांसह अलिबागच्या बंगल्यात लपून होते, असा जोरदार हल्ला शिवसेना नेते, युवासेना प्रमुख-आमदार आदित्य ठाकरे यांनी आज चढवला.

आदित्य ठाकरे यांचा संपूर्ण महाराष्ट्रात ‘शाखासंवाद’ दौऱयांचा झंझावात सुरू आहे. आज कुलाब्यामधील गीता नगर येथे या दौऱयाचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातील शिवसेना उमेदवार अरविंद सावंत हेसुद्धा उपस्थित होते. यावेळी हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

गीता नगरची जनता अरविंद सावंत यांच्यासोबत असल्याचा विश्वास आदित्य ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केला. कुलाब्यातील वॉटर माफिया राज अरविंद सावंत यांनी मोडून काढला आणि इथे विकासगंगा आणली. म्हणून गीता नगरची जनता अरविंद सावंत यांच्यासोबतच राहणार, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

याप्रसंगी शिवसेना उपनेते राजकुमार बाफना, अरविंद नेरकर, विभागप्रमुख संतोष शिंदे, दक्षिण मुंबई लोकसभा समन्वयक सुधीर साळवी आदी पदाधिकारी उपस्थित होते.

भाजपाने जनतेची दिशाभूल करताना निवडणुकीत अनेक स्वप्ने सर्वसामान्यांना दाखवली होती, मात्र प्रत्यक्षात स्थिती कायम उलट राहिली, असे सांगत भाजपच्या फसव्या धोरणांचा आदित्य ठाकरे यांनी बुरखा फाडला. ‘2014 मध्ये वचने दिली ती पूर्ण झाली का? खात्यात 15 लाख रुपये आले का? महागाई कमी झाली का? गॅस सिलिंडर स्वस्त झाला का? पेट्रोल-डिझेल यांच्या आधी किमती काय होत्या आणि आता काय आहेत? विकसित भारताची जी स्वप्नं दाखवली ती पूर्ण झाली का? असे सवाल त्यांनी उपस्थित केले. काळा पैसा परत आणणार असे भाजपवाले म्हणाले, काळा पैसा माहीत नाही, पण यांचा इलेक्ट्रोरोल बॉण्डचा घोटाळा मात्र बाहेर आला, अशी मिश्कील टीका आदित्य ठाकरे यांनी यावेळी केली.

400 पार फक्त संविधान बदलण्यासाठी

भाजपच्या 400 पारच्या नाऱयावर आदित्य ठाकरे यांनी हल्लाबोल केला. ते म्हणाले की, ‘जनतेने आता कोणत्या दिशेने मतदान करायचे हे ठरवले पाहिजे. तुमच्या हातात जो मतदानाचा अधिकार आहे तो राहणार की नाही हे आता ठरणार आहे. भाजपच्या अनेक जणांकडून सांगितले जातेय की, आम्हाला चारशे पार करायचे आहे. कारण त्यांना संविधान बदलायचे आहे. हे तुम्हाला मान्य आहे का?’ असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला.