अजित पवार ही जागा जिंकू शकत नाही…मी बारामतीतून लढणारच; शिवतारेंच्या भूमिकेमुळे महायुतीत संघर्ष

महायुतीत जागावाटपाचा तिढा सुटलेला नाही. त्यातच काही जागांवरून महायुतीतील संघर्ष वाढत असल्याचे दिसत आहे. शिंदे गटातील विजय शिवतारे यांनी अजित पवार यांच्यावर टीकेची झोड उठवत बारामतीतून निवडणूक लढण्याचे जाहीर केले आहे. बारामतीची जागा अजित पवार गटाला मिळण्याची शक्यता असल्याने विजय शिवतारे यांनी आपली उमेदवारी घोषित केली होती. तसेच त्यांनी अजित पवार यांच्यावरही टीका केली होती. त्यानंतर अजित पवार गट आणि शिंदे गटाकडून एकमेंकावर आरोप-प्रत्यारोप करण्यात आले. आता आपण निवडणूक लढण्यावर ठाम असल्याचे शिवतारे यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे महायुतीतील संघर्ष वाढण्याची शक्यता आहे.

बारामती मतदारसंघात 5 लाख 50 हजार मतदार पवारांच्या विरोधातले आहे. ज्यांना पवारांना मतदान करायचे नाही त्या लोकांना लोकशाहीतील हक्क बजावण्यासाठी मी बारामती निवडणूक लढवणार आहे. जनतेच्या आग्रहामुळे मला उभं राहावं लागतंय. पवार कुटुंबाला अनेक लोक कंटाळलेत अशा शब्दात शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांनी बारामतीत निवडणूक लढण्यावर ठाम असल्याचं स्पष्ट केले.

विजय शिवतारे म्हणाले की, पवारांमुळे भोरचा सुपुत्र राज्याचा मुख्यमंत्री झाला नाही. युती धर्म आपल्याला पाळला पाहिजे असं मुख्यमंत्र्यांनी सांगितले. युतीचा प्रत्येक उमेदवार निवडून आला पाहिजे या मताचा मी आहे. मात्र, अजित पवार ही जागा जिंकू शकत नाही हे त्रिवार सत्य आहे. ते जागा जिंकणारच नसतील तर पवारांच्या विरोधात जे आहेत त्यांचे नेतृत्व करण्याची संधी मिळत असेल तर मी का करू नये, असा सवालही शिवतारे यांनी केला आहे. बारामती लोकसभा मतदारसंघावर कुणाचा सातबारा नाही, असेही ते म्हणाले. निधी वाटपात कायम दुजाभाव, विकासात अडथळा आणण्याचा प्रयत्न अजित पवारांनी नेहमी केला आहे, असा आरोपही विजय शिवतारे यांनी केला आहे.